देवकाते हे बुधवारी दुपारी नीरावागज येथील वाघेश्वरी सोसायटीचे सचिव महादेव कुंभार यांच्याबरोबर भिगवण चौक लगत असणाऱ्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये आले होते. येथे त्यांनी शेतकी अधिकाऱ्यांना भेटून कामाचा संदर्भ सांगितला. यादरम्यान देवकाते यांनी कुंभार यांना घरून २ लाख रुपये घेऊन येण्यास सांगितले होते. सदर रक्कम देवकाते यांनी स्वतःकडे घेऊन एका बॅगेत ठेवली.
बँकेतून खाली रस्त्यावर आल्यावर त्यांनी रक्कम असलेली बॅग दुचाकीला अडकवली. त्यानंतर ते दुचाकीवरून महात्मा गांधी बालक मंदिर जवळून जात होते. तेथील टरबूज विक्रेत्याने तुमचे पैसे पडले असल्याचे सांगितले. त्यामुळे देवकाते दुचाकी बाजूला लावून खाली उतरले. यावेळी पाठीमागे रस्त्यावर ५० रुपयांच्या २ व १० रुपयांच्या ३ नोटा पडलेल्या दिसल्या. त्या गोळा करून देवकाते दुचाकी जवळ आले असता, दुचाकीला अडकवलेली बॅग गायब झाल्याचे आढळून आले. या बॅगेत २ लाख रुपयांच्या रकमेसह घरातील सदस्यांची बँक पुस्तके व चेक पुस्तके होती. शहर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
-----------------------