सांगवी (बारामती) : बारामती मतदार संघात अनेक आव्हानांना झेलत लोकसभेच्या निवडणुकीत सुप्रिया सुळेंना (Supriya sule) विजयी केल्या नंतर आता विधानसभेच्या निवडणुकीला शरद पवारांनी लक्ष करत मोर्चे बांधणीची जोरदार तयारी केल्याचे दिसून येत आहॆ. आपल्याला आता बदल घडवायचा आहे, तरुणांनी ज्या प्रकारे लोकसभेच्या निवडणुकीत साथ दिली तशीच यापुढे देखील आम्हाला विधानसभेला साथ द्या असे आवाहन करत कामाला लागण्याचे आदेश शरद पवार ( Sharad Pawar) यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.
सध्या शरद पवार गटाकडून अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार (Yugendra Pawar) विधानसभेची निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) विरोधात यंदाच्या विधानसभेला कोण टक्कर देणार याची उत्सुकता बारामतीकरांना लागली आहे. यामुळे विधानसभेची निवडणूक ही उपमुख्यमंत्री अजित पवारांसाठी प्रतिष्ठेची लढाई असणार आहॆ. विधानसभेला नक्कीच शरद पवार गट आणि अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांपुढे मोठे आव्हान निर्माण होणार आहे.
या अगोदर ठाकरे, मुंडे, तटकरे, क्षीरसागर, निलंगेकर अशा अनेक दिग्गज राजकीय घरण्यांत पडलेली उभी फूट अख्या महाराष्ट्राने पाहिली. पण शरद पवारांच्या कुटुंबातली फूट अलीकडील आणि देश पातळीवर चर्चेचा मोठा विषय ठरली आहे. लोकसभा निवडणुकित संपूर्ण देशानं 'सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे' लढाईत सुप्रिया सुळे यांची सरशी झाल्याचे पाहायला मिळाले. पण तरीही त्यावर मात करण्यासाठी अजित पवार यांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना थेट राज्यसभेवर पाठवलं आहॆ.
बारामती तालुक्यातील सांगवी,शिरवली येथील तरुणांना केले. लोकसभेच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार या नणंद भावजयच्या लढतीत सुप्रिया सुळे विजयी झाल्या नंतर शरद पवार यांनी आभार दौरा सुरू केला असून बारामती तालुका पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. यानिमित्ताने विधानसभेला यामुळे अजित पवार यांच्या पुढे मोठे आव्हान निर्माण झाल्याचे चित्र आहॆ. सध्या तरुण वर्ग शरद पवारांकडे आकर्षित होतं असल्याची देखील चर्चा रंगलीये. सध्या नीरा नदीच्या प्रदूषणामुळे नीरा नदी काठचे शेतकरी संतापले आहेत. माजी उपसरपंच पोपट तावरे यांनी नीरा नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित करताच लवकरच नीरा नदीच्या प्रदूषणाचा तिडा सोडण्याचे आश्वासन यावेळी शरद पवार यांनी सांगवीकरांना दिले.
शिरवली येथील जुन्या वर्ग मित्रांच्या घऱी जाऊन विचार पुस करत जुन्या आठवणींना पवारांनी उजाळा दिला. लोक सभेला बारामती तालुक्याने सुप्रिया सुळेंना भरघोस मतदान केले. यामुळे पवार आता विधानसभेच्या तयारीला लागून तरुणांपासून मोट बांधणीला सुरूवात केली. लोकसभेनंतर विधानसभेला बारामतीकर शरद पवार की अजित पवार यांना साथ देणार हे येत्या विधानसभेच्या निवडणुकीत समजणार आहॆ.