बारामती (पुणे) : बारामती सहकारी बँकेने पारदर्शक लाेकाभिमुख कारभाराने नाव निर्माण केले. गेल्या आर्थिक वर्षात बँकेने चांगली प्रगती साधत यशाचे शिखर गाठण्याचा प्रयत्न केला. तसेच राज्यात आदर्श बँक म्हणून नावलाैकिक मिळविला, तसेच ‘अ’ वर्ग मिळविण्यात देखील संचालक मंडळाला यश आले, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बँकेचे चेअरमन आणि संचालक मंडळाची पाठ थोपटली.
बारामती सहकारी बँकेच्या ६२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बाेलत होते. यावेळी पवार पुढे म्हणाले, बँकेचा कारभार पाहताना संचालक मंडळाला कठोर भूमिका घ्यावी लागली. मात्र, गेल्या वर्षात चांगली प्रगती साधली. ठेवीदारांचा विश्वास जपण्यासाठी थकबाकी वसुलीचे प्रमाण कमी ठेवण्यासाठी प्रयत्न करणे ही चांगली बाब आहे. एनपीएचे प्रमाण कमी करण्यासाठी संचालक मंडळाने प्रयत्न करावा. यामध्ये संचालक मंडळाने अगदी ‘अजित पवार’चे खाते थकीत असले तरी कठोर भुमिका घ्यावी. सहकारात वशिला, पक्षीय राजकारण न आणता सर्वांना मदत होणे आवश्यक आहे. यामध्ये केवळ लोकहित जपणे महत्वाचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाची अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर पाचव्या क्रमांकावर आणायची आहे. त्यासाठी महराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा सिंहाचा वाटा असणार आहे. यासाठी सर्वांच्या सामुहिक प्रयत्नांची गरज पवार यांनी व्यक्त केली.
बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिन सातव म्हणाले, बारामती सहकारी बँक आधुनिकीकरणाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. लवकरच बँकेचा कारभार पेपरलेस केला जाईल. बँकेचा एनपीए १४.८५ टक्क्यावरुन ७.६५ टक्क्यावर आणला आहे. डिसेंबरपर्यंत तो ३ टक्के, तर पुढील सभेपर्यंत ते प्रमाण शुन्य टक्क्यावर आणण्याचा विश्वास सातव यांनी व्यक्त केला.
कार्यकारी संचालक रविंद्र बनकर यांनी विषय वाचन केले. यावेळी तैनुर शेख, करीम बागवान, सुर्यकांत गादीया, संभाजी माने, अॅड प्रभाकर बर्डे, प्रदीप शिंदे, बाबुराव कारंडे यांनी सुचना मांडल्या. यावेळी बारामती बँकेचे चेअरमन सचिन सातव, व्हाइस चेअरमन किशोर मेहता, प्रशांत काटे, संभाजी होळकर, जय पाटील, याेगेश जगताप, प्रताप पागळे आदी उपस्थित होते.