टॅक्टर, दुचाकी, सायकलचोरीचे अनेक गुन्हे उघड
बारामती: बारामती परिसरात वाढत्या दुचाकीचोरीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी राबविलेल्या शोधमोहिमेला यश आले आहे. पोलिसांनी अल्पवयीन चोराचा वापर करून सुरू असलेली दुचाकीचोरी उघड केली आहे.यावेळी केलेल्या कारवाईत ८ लाख २० हजारांची वाहने जप्त केली आहे. याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. जप्त केलेल्या वाहनांमध्ये ट्रॅक्टर, सात मोटार सायकली, दोन क्रॉस कंपनीच्या रेंजर सायकल, तसेच विहिरीतील वीजपंपाची २०० मीटर केबल आदीचा समावेश आहे.
मागील काही दिवसांपासून तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरीस जाण्याचे प्रमाणात वाढ झाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी मोटारसायकल चोरी उघड करण्याबाबत आदेश दिले होते. त्या अनुषंगाने गुन्हे पथकाने गुप्त माहितीच्या आधारे संशयित नवनाथ केरबा सोनवणे (वय २५) रा. ढेकळवाडी व एक अल्पवयीन बालक यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चोरीचा छडा लावण्यासाठी कसून चैकशी करून त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यानुसार आरोपींकडून तालुका पोलीस ठाणे हददीतून चोरी केलेला एक टॅक्टर, तसेच बारामती शहर, भिगवण, जेजुरी परिसरातून चोरीस गेलेल्या एकूण ७ दुचाकी, दोन क्रॉस कंपनीच्या रेंजर सायकल, तसेच विहिरीतील वीजपंपाची २०० मीटर केबल असा एकूण ८ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून आरोपींना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती गुन्हेशोध पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे यांनी दिली.
पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल पांढरे, नंदू जाधव, विजय वाघमोडे, विनोद लोखंडे, शशिकांत दळवी,होमगार्ड सिद्धार्थ टिंगरे,ओंकार जाधव यांनी कारवाई केली आहे.
बारामतीत वाहने चोरी करणाऱ्या आरोपी आणि दुचाकीसह तालुका पोलिसांचे पथक.
१५ बारामती—०४