बापू बैलकर, पुणेजिल्ह्यात सर्वत्र कडक उन्हाळा जाणवू लागला असून, गावा-गावांत पाणीटंचाई भेडसावू लागली आहे. ५ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. गेल्या पाच वर्षांत मार्च महिन्यात केलेल्या पाहणीनुसार बारामती, दौंड, हवेली, इंदापूर, शिरूर , मावळच्या पाणीपातळीत १ मीटरपर्यंत घट झाली आहे. यावर्षी अवकाळीने ही पातळी स्थिरावण्यास थोडासा दिलासा मिळाला असला तरी उन्हाळ््यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत भूजल पातळीचा अभ्यास करण्यासाठी वर्षातून चार वेळा जानेवारी, मार्च, मे व सप्टेंबर/ आॅक्टोबर महिन्यात भूजल पातळी मोजली जाते. यासाठी जिल्ह्यात १९२ निरीक्षण विहिरी निश्चित केल्या आहेत. आॅक्टोबरमधील पाणीपातळी व मागील पाच वर्षांतील पाणीपातळी, तसेच पर्जन्यमानातील घट वा वाढ याचा शास्त्रीय अभ्यास करून संभाव्य पाणीटंचाई अहवाल केला जातो. यानुसार आंबेगाव, भोर, जुन्नर, खेड, पुरंदर, मुळशी व वेल्हा या सात तालुक्यांतील भूजलपातळीत घट झाली नसल्याचे दिसून आले आहे. तर बारामती, दौंड, हवेली, इंदापूर, शिरूर, व मावळ तालुक्यात 0 ते १ मीटर भूजलपातळीत घट झाली आहे. गेल्या पाच वर्षांतील भूजलपातळीचा सरासरी अभ्यास केला असता यंदा 0.१0 मीटरर्सने घट झाली आहे. अवकाळी पावसामुळे यावर्षी भूजलपातळीला काहीसा दिलासा मिळाला असला, तरी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता भूजल सर्वेक्षण विभागाने वर्तवली आहे.
बारामती, दौंडचे पाणी गेले खोल !
By admin | Published: April 02, 2015 5:54 AM