पुणे : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघाचा समावेश असून, येथे अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी एक अर्ज दाखल झाला आहे. तसेच सुमारे ४० अर्जांची विक्री झाल्याची माहिती बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिली. अर्ज भरण्याची मुदत दि. १९ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे.
या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, तर महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या नणंद-भावजयींमध्ये सरळ लढत होणार आहे. सुळे आणि पवार यांच्याशिवाय ओबीसी बहुजन पक्षाकडून महेश भागवत हे निवडणूक रिंगणात आहेत. वंचित बहुजन आघाडीने खासदार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला आहे. अन्य छोटे पक्ष आणि अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार असले, तरी खरी लढत ही सुळे आणि पवार यांच्यातच पाहायला मिळणार आहे. दरम्यान, अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी एक उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. बहुजन समाज पार्टी आंबेडकर गटाच्या त्रिशला मिलिंद कांबळे यांनी हा अर्ज दाखल केला आहे, तर दिवसभरात ४० अर्जांची विक्री झाल्याचे द्विवेदी यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ असे चार लोकसभा मतदारसंघ आहेत. यंदा जिल्ह्यात दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात ७ मेरोजी बारामतीसाठी, तर १३ मे रोजी पुणे, शिरूर आणि मावळसाठी मतदान होणार आहे. त्यानुसार बारामती मतदारसंघासाठी १२ ते १९ एप्रिल या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत, तर २० एप्रिलला उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून, २२ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदार
विधानसभा मतदारसंघ २०१९ २०२४ फरक
दौंड ३,०९,१६८..... २,९९,२६०... -९९०८
इंदापूर ३,०५,५७९... ३,१८,९२४... १३,३४५
बारामती ३,४१,६५७... ३,६४,०४०... २२,३८३
पुरंदर ३,६१,४८०... ४,१४,६९०... ५३,२१०
भोर ३,६१,४१५... ३,९७,८४५... ३६,४३०
खडकवासला ४,८६,९४८.... ५,२१,२०९... ३४,२६१