बारामती : ‘गौतमभाई’ आणि ‘प्रीतीभाभी’ दोघेजण आवर्जुन अहमदाबादवरुन बारामतीला आले आहेत. गौतमभाईंना बारामती काही नवीन नाही. अदाणी आणि पवार कुटुंबियांचे गेल्या २५ ते ३० वर्षांपासुन ऋणानुबंध आहेत. गेली अनेक वर्ष गौतमभाई दिवाळीला दरवर्षी बारामतीला येतातच. खरंतर आपण तिथीनुसार आपण दिवाळी साजरी करतो. परंतु बारामतीची खरी दिवाळी आज सायन्स सेंटरच्या माध्यमातून साजरी होत आहे. त्यासाठी योगायोगाने गौतमभाई उपस्थित राहिले. बारामतीत चांगल काहीतरी घडतंय. म्हणुनच एवढे सायंटीस्ट या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी पवार कुटुंबाचे अदानी कुटुंबियांसमवेत असणारे ऋणानुबंध उलगडले.
तसेच पुरंदर —बारामतीच्या सीमेवर प्रसिध्द उद्योगपती गौतम अदानींचा खासगी विमानतळ होणार असल्याची चर्चा आहे. सायन्स अॅण्ड इनोव्हेशन अॅक्टीव्हीटी सेंटरच्या उदघाटनाच्या निमित्ताने अदानी यांनी आज सपत्नीक दिलेली भेट भुवया उंचावणारी ठरली. कार्यक्रमानंतर उद्योगपती अदानी यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गोविंदबाग निवासस्थानी भेट देत स्नेहभोजन केले. सुमारे पाऊस तास अदानी पवार कुटुंबियांसमवेत होते. या पार्श्वभुमीवर एकुणच अदानी—बारामती बंध अधिक मजबूत होत असल्याचे संकेत आहेत.
एकीकडे केंद्रातील भाजपा सरकार उद्योजक अदानी यांना उद्योग क्षेत्रात झुकते माप देत असल्याची नेहमी चर्चा होते. या पार्श्वभुमीवर देशातील बडे उद्योजक गौतम अदानी यांची बारामती भेट औत्सुक्याचा विषय होती. आजच्या कार्यक्रमात अदानी यांना आयोजकांनी भाषणासाठी नाव पुकारत विनंती केली. मात्र, भाषण करणे त्यांनी टाळले. यावेळी दौऱ्यात अदानी यांची देखील उपस्थिती होती. यावेळी प्रीती अदानी यांना बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या वस्तुंसह सेंद्रीय पध्दतीने उत्पादीत केलेल्या भाजीपाल्याची टोपली देखील देण्यात आली
उद्योगपती गौतम अदानीं आणि रोहित पवारांचा एकत्रित प्रवास
सायन्स अॅण्ड इनोव्हेशन अॅक्टीव्हीटी सेंटरच्या उदघाटनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आलेले उद्योगपती गौतम अदानी यांचे स्वागत करण्याची जबाबदारी आमदार रोहित पवार यांनी पार पाडली. यावेळी गौतम अदानी आणि रोहित पवार एका गाडीतून प्रवास केला. रोहित पवार यांनी स्वत: सारथ्य करीत गाडी चालवत अदानी यांना मुख्य कार्यक्रम स्थळापर्यंत पोहोचवले.