सुपे : बारामती तालुक्यातील सुपे परगण्याला जीवदान देणारी जनाई उपसा जलसिंचन योजनेच्या हक्काचा पाणी प्रश्न पेटला आहे. या भागाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या समोर शेतकऱ्यांनी जनाई योजनेतील तृटींचा पाढा वाचला. यावर तातडीने तोडगा न निघाल्यास येत्या २६ जानेवारीला आमरण उपोषणाचा निर्णय घेण्यात आला आहे.
सुपे येथील माऊली मंदिरात जनाई उपसा जलसिंचन योजनेच्या हक्काच्या पाणी प्रश्नासंबंधीची बैठक खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी शेतकरी संघर्ष कृती समितीच्यावतीने पाण्याचे एक वर्षाचे नियोजन करुन तीन टप्यात पाणी देण्याची मागणी करण्यात आली. तसेच या योजनेद्वारे गेल्या ३० वर्षात २० टक्के शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही. ही योजना सुरु झाल्यापासुन आंबी, चांदगुडेवाडीचा काही भाग, शेरेवाडी, बाबुर्डी, काऱ्हाटी आणि जळगाव सुपे आदी गावांचा बहुतांश शिवार ओलिताखाली आलेला नाही. त्यामुळे आमच्या हक्काचे २ हजार १७० एमसीएफटी पाण्याचे तीन टप्यात वाटप करावे. तसेच पावसाळ्यात नद्यांना ओव्हर फ्लो होणारे पाणी लाभधारक शेतकऱ्याना मिळावे. येथे जलसंपदाचे ऑफिस व्हावे अशा एकुण प्रमुख १२ मागण्याचे निवेदन खासदार सुळे यांच्याकडे देण्यात आले.
यावेळी शेतकरी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष पोपट खैरे, ॲड. दत्तायय बोरकर, ज्ञानेश्वर कौले, महादेव भोंडवे, कालिदास भोंडवे आदींनी जनाई मध्ये असलेल्या तृटींबाबत सवुस्तर माहिती दिली. यावेळी शिरसाई उपसा योजनेचे उपोषणकर्ते व माजी सरपंच विठ्ठल जराड यांनी जलसंपदा आणि महापालिका यांच्याविरोधात उच्च न्यायालयात हक्काच्या पाण्याबाबत दावा दाखल करणार असल्याचे सांगितले. दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी अतुल कपोले यांच्याशी फोन द्वारे माहिती दिली. यावेळी जनाईचा प्रश्न त्वरित सोडवण्यासंदर्भात चर्चा केली. यावेळी कपोले यांनी येत्या २३ जानेवारी पर्यत शेतकऱ्यांची बैठक घेवु. तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याबाबत प्रयत्न करु असे सुळे यांना सांगितले. मात्र शेतकऱ्यांनी आक्रमक होऊन जलसंपदा अधिकाऱ्यांनी सुप्यात येवुन आमचे प्रश्न मार्गी लावावेत यावर शेतकरी ठाम आहेत. तोडगा न निघाल्यास २६ जानेवारी पासुन हक्काच्या पाण्यासाठी आमरण उपोषण आंदोलन करणार असल्याचे पत्र सुळे यांना यावेळी देण्यात आले.