लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गावातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तसेच त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये घनकचरा प्रकल्प उभारले जाणार आहेत. आतापर्यंत १ हजार १३९ प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली, तर ६९७ प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यापैकी केवळ ७२ प्रकल्पांचे काम प्रत्यक्षात सुरु झाले आहेत. मात्र, बारामती आणि खेड तालुक्यांत एकाही प्रकल्पाच्या कामाला सुरूवात झालेली नाही.
घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांच्या ३ जून ते २० सप्टेंबरदरम्यान झालेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. त्यात काही तालुक्यांतील काम असमाधानकारक असल्याचे समोर आले. याविषयी स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांविषयी नाराजी व्यक्त करण्यात आली. ग्रामीण भागाला कचरामुक्त करण्यासाठी स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जिल्ह्यातील १ हजार ३८५ गावांमध्ये घनकचरा प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्यासाठी निधीही उपलब्ध झाला आहे. आतापर्यंत १ हजार १३९ गावांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. त्यातील ६९७ प्रकल्पांना प्रशासकीय मान्यताही देण्यात आली. तर केवळ ७२ प्रकल्पांच्या कामांना प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. बारामती तालुक्यात ९७ गावांत प्रकल्प प्रस्तावित आहे. त्यातील ७६ प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. तर एकाही प्रकल्पाचे काम सुरु झालेले नाही. त्याबरोबरच खेड तालुक्यातील १६१ पैकी १२४ प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या ठिकाणीही एकही प्रकल्प सुरु झालेले नाही.
-----------
प्रकल्पांसाठी हवी शासकीय जागा
जिल्ह्यातील ४०२ ग्रामपंचायतींनी घनकचरा व्यवस्थापनासाठी शासकीय गायरान जागा मिळावी, या मागणीचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले आहेत. तसेच ३२९ ग्रामपंचायतींनी तहसील कार्यालयांकडे सादर करण्यात आले, तर ११८ प्रस्तावांची पूर्तता करण्यात आली आहे.
चौकट
कचरा व्यवस्थापनकरिता तांत्रिक मनुष्यबळ अत्यंत आवश्यक होते. याकरिता कंत्राटी स्वरुपात ७५ अभियंत्यांची जून २०२१ पासून बाह्य यंत्रणेमार्फत नियुक्ती करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघाकरिता एक अभियंताप्रमाणे ७५ जिल्हा परिषद मतदारसंघाकरिता अभियंत्यांची नियुक्ती केलेली आहे. संबंधित अभियंते गावांमध्ये भेट देऊन गावस्तरावर घनकचरा व्यवस्थापनचे प्रकल्प अहवाल व अंदाजपत्रक तयार करत आहेत.
चौकट
स्वच्छता व आरोग्य याचा अत्यंत जवळून संबंध असून कोरोनाकाळात स्वच्छतेचे महत्त्व प्रकर्षाने जाणवले. त्यानुसार सर्व गावांनी आपल्या गावातील निर्माण होणारा कचऱ्याचे उचित व्यवस्थापन वेळेत पूर्ण करुन गाव स्वच्छ व सुंदर ठेवणे आवश्यक आहे. याकरिता गटविकास अधिकारी यांनी संबंधित सर्व गावचे सरपंच, ग्रामसेवक यांचेकडे सततचा पाठपुरावा करून मोहीम स्वरूपात निविदा प्रक्रिया पूर्ण करुन कामे सुरु करुन २ ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत.