Baramati Lockdown : उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत मंगळवारी मध्यरात्रीपासून ७ दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 03:21 PM2021-05-03T15:21:04+5:302021-05-03T15:21:41+5:30
कोरोनाची वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक लॉकडाऊनचा मार्ग वापरण्याच्या सूचना अजित पवार यांनी रविवारी(दि २) झालेल्या बैठकीत दिल्या होत्या.
बारामती: दुकाने बंद ठेवल्यानंतर देखील कोरोना रुग्णसंख्या कमी होत नसल्याने प्रशासनाने अखेर मंगळवारी (दि ४) रात्री १२ वाजल्यापासुन सात दिवस कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे.यामध्ये केवळ औषधे आणि दुध विक्री दुकाने सुरु राहणार आहेत.त्यात दुधविक्री केवळ सकाळी ७ ते ९ यावेळेत दोन तास सुरु राहणार आहे.
बारामतीत सोमवारी (दि ३) ) उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत निर्णय घेण्यात आला. यावेळी व्यापारी महासंघासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते.
बारामतीत लॉकडाऊन सुरु असला तरी तो कडक स्वरुपाचा नाही, अनेक ठिकाणी या काळातही गर्दी दिसते अशी चर्चा झाल्यानंतर साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊनचा मार्ग वापरण्याच्या दृष्टीने आज अजित पवार यांच्या बैठकीत रविवारी(दि २) चर्चा झाली.यावेळी पवार यांनी कडक लॉकडाऊनबाबत प्रशासनाला सूचना केल्या होत्या.त्यानुसार आज झालेल्या बैठकीत कडक लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्यात आला.
दरम्यान,एमआयडीसीतील बडे उद्योग,कंपन्या सुरुच राहणार आहे.किरकोळ व्यवसाय मात्र बंद ठेवण्यात येणार असल्याचे समजते.या सात दिवसात रुग्णसंख्या आटोक्यात न आल्यास आणखी सात दिवस कडक लॉकडाऊन जाहीर करण्याचे संकेत या बैठकीत देण्यात आले आहेत.
——————————————