Baramati Lockdown : उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत व्यापारी वर्गाचा 'एल्गार' ; सोमवारपासून दुकाने नियमितपणे उघडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2021 03:27 PM2021-04-09T15:27:24+5:302021-04-09T15:49:45+5:30
Coronavirus Baramati: बारामतीतील ब्रेक द चेन अंतर्गत ३० एप्रिलपर्यंत दुकाने बंद ठेवण्याला व्यापारी वर्गाचा तीव्र विरोध....
बारामती: बारामती शहरातील व्यापाऱ्यांनी सोमवारपासून दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला आहे.महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांच्या शिखर संस्था महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, फॅम इत्यादी यांच्या सूचनेनुसार बारामती व्यापारी महासंघाच्या सर्व सदस्य संघटनांनी राज्य शासनाने पुकारलेल्या पुढील २ दिवस शनिवार व रविवार च्या कडकडीत बंदला पाठिंबा दिला आहे. मात्र, सोमवार (दि १२) पासुन दुकाने उघडण्याचा निर्णय देखील घेतला आहे.
६ एप्रिल रोजी जिल्ह्यातील ग्रामीण भाग, ग्रामपंचायती, नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती आदी हद्दींमध्ये ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत ३० एप्रिल पर्यंत संचारबंदी वाढवण्याचा आदेश देण्यात आला .त्यानंतर स्थानिक प्रशासनाने अत्यावश्याक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर अचानक व्यापारी व किरकोळ विक्रेत्यांना धक्का बसला.या निर्णयामुळे व्यापारी नाराज होते.अखेर शुक्रवारी (दि ९) झालेल्या बैठकीत दुकाने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला.
सोमवारपासून सर्व व्यापाऱ्यांनी आप आपली दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या कालावधीत उघडावीत. यावेळी सरकारने दिलेल्या कोव्हिडं १९ च्या सर्व नियमांचे पालन करावे. तसेच आपल्या कर्मचारी व ग्राहक यांच्या सुरक्षेची योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन व्यापारी वर्गाने केले आहे.
बैठकीसाठी अध्यक्ष नरेंद्र गुजराती, उद्योगपती सचिन सातव, सुशील सोमाणी, स्वप्निल मुथा, प्रवीण गांधी, चेतन व्होरा, अभय गादीया, संजय सोमाणी, बाळू चांदगुडे, सुधीर वाडेकर, परेश वीरकर, नरेंद्र मोता, शैलेश साळुंखे, सुरेंद्र मुथा, फकृशेत भोरी, जगदीश पंजाबी, प्रवीण आहुजा, प्रमोद खटावकर, किरण गांधी आदी उपस्थित होते.
————————————————