बारामती (पुणे) : जुलै महिन्यात राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. त्यानुसार आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांचा व कमळ हाती घेणाराच असणार आहे, असे काळे यांनी सांगत बारामती लोकसभेबाबत महत्वाची भूमिका मांडली आहे.
भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर काळे यांचा बारामतीत पहिलाच भाजप दौरा मंगळवारी(दि २६) पार पडला. यावेळी बदलत्या राजकीय समीकरणांवर पत्रकारांशी बोलताना काळे म्हणाले, अपेक्षित राजकीय घडामोडींमुळे भाजपच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था होती. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन भाजपची भूमिका समजावून सांगत पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपचे लक्ष आगामी लोकसभा निवडणुका आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील ६० हजार घरांमध्ये पोहोचण्याचे भाजपचे अभियान त्यामुळे सुरू केले आहे. या सर्व घरांमध्ये धोरणे पोहोचविणार आहोत. बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक भाजप पूर्ण ताकदीने लढवणार आहे.
निवडणुकी अगोदर उमेदवाराचे नाव भाजप निश्चित करत नाही. मात्र, बारामती लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी मोदींच्याच विचारांचा उमेदवार असणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक महायुतीच्या माध्यमातून एकत्रित लढवली जाणार आहे. आज संपूर्ण देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विचार स्वीकारला आहे. भाजपचा जनाधार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा भारतीय जनता पक्षाला मिळणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप व मित्रपक्ष एकत्र लढवणार आहेत. या निवडणुकीतही भाजप व मित्र पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील असा विश्वास आहे.
यावेळी भाजपचे विधानसभा प्रमुख रंजनकुमार तावरे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे, भाजपचे शहराध्यक्ष सतीश फाळके, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष राजेश कांबळे, बाजार समितीचे माजी संचालक पोपटराव खैरे, वैभव सोलनकर आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.