बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघ म्हणजे कोणाचा सातबारा नाही. तो सातबारा जनतेच्या नावावर आहे. ज्या दिवशी जनतेच्या मनात येईल, त्या दिवशी येथे बदल निश्चित आहे. आमची लढाई कोणाबरोबर वैयक्तिक परिवाराशी नाही. तर त्या प्रवृत्तीशी आहे. जिथे सर्वसामान्य माणूस दाबुन टाकले जात असल्याची टीका माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केली.
शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या बैठकीसाठी ते बारामती येथे आले होते. यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिवारवाद असणारे पक्ष संपविण्याची केलेली घोषणा रास्त आहे. एकाच परिवाराकडे सततची सत्ता राहिल्यास सर्वसामान्यांना टाचेखाली घेतले जाते. बारामतीत लोकांसाठी आणलेल्या निधीचा वापर होत असताना प्रचंड भ्रष्टाचार होत आहे. सकारात्मक विचारांची लोक एकत्र झाल्यास बारामतीत जादु होण्यास वेळ लागणार नाही. आतापर्यंत बारामतीची खासदारकीची निवडणुक म्हणजे ‘नुरा कुस्ती’ असा इतिहास घडत आला आहे. यंदा नुरा कुस्ती होणार नाहि. मात्र,बारामतीकरांनी ठाम राहुन प्रवृत्तीच्या विरोधात भावनेच्या आहारी न जाता मतदान करावे,असे शिवतारे म्हणाले.
आगामी बारामती लोकसभा निवडणुकीत १०० टक्के टक्कर देण्यास आपण सक्षम आहोत. हे कोणी सांगण्याची गरज नाही. हि वैयक्तिक लढाई नाही. मात्र,सर्वांनी सांगितल्यास ती निवडणुक लढवु. इतिहास घडविण्यासाठी हिंमत,बळ असावे लागते. देवाच्या कृपेने माझ्यात ते गुण आहेत.राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा देखील आपल्याला छुपा पाठींबा आहे. मात्र,त्यांना टाचेखाली घेण्याची भीती वाटते. योग्य वेळी ते कार्यकर्ते मदत करतील, असा दावा माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केला
... निवडणुकीत माझा गेम केला
मागील विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी माझा गेम केला. त्यांनी पक्षाची स्वत:ची सीट सोडुन काँग्रेसला दिली. सर्व सहा पक्ष एकत्र केले. मी आजारी असताना त्यांनी कसा डाव केला,खोटेपणा केला. याबाबत सर्वांना माहिती आहे. मला हरविण्याची भाषा करणारे अजित पवार त्यांच्या स्वत:च्या मुलाला निवडुन आणु शकले नाहित, असे विजय शिवतारे म्हणाले.