- विवेक भुसेपुणे - बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार उभ्या राहिल्या आहेत. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे या लढत देत आहेत. त्याला पवार विरोधात पवार, असे स्वरूप आले आहे. मात्र, हे प्रथमच घडले, असे नाही. ६४ वर्षांपूर्वीही पवार विरुद्ध पवार, अशी लढत बारामतीमध्ये झाली होती.
शरद पवार यांच्या आई शारदाबाई पवार या शेकापच्या नेत्या. घरातील सर्व जण शेकापचे काम करत असत. शरद पवार हे पुण्यात शिकत असताना काँग्रेसचे काम करू लागले. यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना युवक काँग्रेसचे सचिव म्हणून नियुक्त केले. बारामतीतून १९५७ मध्ये केशवराव जेधे निवडून आले होते. त्यांचे १९५९ मध्ये निधन झाले. त्यानंतर पोटनिवडणूक लागली. काँग्रेसने त्यांचे पुत्र गुलाब जेधे यांना उमेदवारी दिली. शेकापने शरद पवार यांचे सख्खे भाऊ वसंतराव पवार यांना उमेदवारी दिली. त्यामुळे शरद पवारांची द्विधा मन:स्थिती झाली. एका बाजूला सख्खा भाऊ, तर दुसरीकडे पक्ष, अशी परिस्थिती होती. त्यांची ही मन:स्थिती वसंतराव पवार यांनी ओळखली. त्यांनी शरद पवार यांना सांगितले की, तू वेगळी विचारधारा अवलंबली आहे. त्या विचारधारेच्या उमेदवाराचा प्रचार कर. आई शारदाबाई यांनीही त्याला हरकत घेतली नाही.
जेधे विरुद्ध पवार असा रंगला होता सामना पवार यांचे सर्व कुटुंबीय शेकापचे उमेदवार वसंतराव पवार यांचा प्रचार करत होते. दुसरीकडे शरद पवार हे काँग्रेसचे उमेदवार गुलाब जेधे यांचा गावोगावी प्रचार करत होते.काँग्रेसने प्रतिष्ठेच्या केलेल्या या पोटनिवडणुकीत जेधे विजयी झाले. आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीलाच शरद पवार यांनी आपल्या सख्ख्या भावाविरोधात प्रचार केला.