Baramati Lok Sabha Election 2024: बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होत आहे. दोन्ही बाजूंनी सध्या जोरदार प्रचार सुरू आहे. महायुतीतील दिग्गज नेते या मतदारसंघात प्रचारसभा घेत आहेत, आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदापुरात सभा घेतली. या सभेच्या आधी खासदार सुप्रिया सुळे यांचे इंदापूर प्रचार प्रमुख असलेले प्रविण माने यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. यामुळे आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदापूरात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या स्वागतासाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राहुल कुल, पृथ्वीराज जाचक, प्रविण माने, उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी प्रविण माने यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
इंदापूरच्या राजकारणात प्रविण माने हे महत्वाचे नेते मानले जातात. प्रविण माने हे जिल्हा परिषदेत सभापती होते. सोनाई परिवाराच्या माध्यमातून त्यांचं मोठं काम आहे. या माध्यमातून त्यांनी अनेकांना रोजगार दिला आहे. ते शरद पवार यांच्या जवळचे मानले जातात. या निवडणुकीच्या सुरुवातीलाच त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रचार सुरू केला होता. पण, काही दिवसापूर्वी इंदापूरातील झालेल्या सभेला त्यांनी दांडी मारली होती. यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होत्या. प्रविण माने हे सुप्रिया सुळे यांचे इंदापूर तालुका प्रचार प्रमुख आहेत.
मविआचा तिढा, काँग्रेस नेत्यांचं वेट अँन्ड वॉच; दिल्ली हायकमांडच्या आदेशाकडे लक्ष
दरम्यान, आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रविण माने यांच्या निवासस्थानी भेट दिली त्यामुळे प्रविण माने आता शरद पवार यांची साथ सोडणार का अशा चर्चा सुरू आहेत.