Baramati Lok Sabha Election 2024 ( Marathi News ) : बारामती लोकसभा मतदारसंघावर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी लढत आहे. यामुळे या मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, आज सकाळी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात पैसे वाटल्याचा आरोप अजित पवार (Ajit Pawar) गटावर केला. या आरोपाला आता अजित पवार गटाचे आमदार सुनिल शेळके यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
आमदार सुनिल शेळके म्हणाले, बारामतीच्या युवराजांना मला एवढं सांगायचं आहे की, निवडणुकीची प्रक्रिया होत असताना लोकशाहीच्या मार्गाने झाली पाहिजे. आपण प्रचाराकरिता आपल्याकडे नोकरीला असलेल्या कामगार बांधवांना प्रचारात उतरवलं यात आम्ही कोणताही आक्षेप घेतला नाही. आमच्या अजितदादांचे सहकारी, तालुक्यातील समर्थक प्रचार करत असताना तुम्ही त्यांच्या गाड्यांमध्ये पैसे टाकले, अर्धवट व्हिडीओ बनवले, खोटे आरोप केले. मला त्यांना एवढच सांगायचं आहे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, पराभव समोर दिसू लागला आहे म्हणून भोरमधील स्थानिक गुंडांना बरोबर घेऊन भोर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना जी काही मारहाण केली, त्या मारहाणीची शिक्षा आपल्याला भोगावी लागेल. आम्ही पोलिसांत कारवाई करण्याची मागणी केली आहे.
राजकारण करत असताना रोहित पवार राम कृष्ण हरी वाजवा तुतारी सांगत होते, पण अखंड महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या खंडोबा रायाच्या पायथ्याला मटणाच्या दोन दोन हजार टनाच्या गाड्या तुम्ही खाली केल्या. तिथं दारु,पैसे वाटले. तुम्ही आम्हाला राजकारण आणि स्वाभिमान शिकवू नये. रोहित पवार यांची नौटंकी सुरू आहे त्यांची आम्ही भांडफोड करत आहे त्यामुळे ते आम्हाला टारगेट करत आहेत. मला त्यांना एवढंच सांगायचे आहे, नौटकी करुन राजकारण करु नका, साहेबांच्या नावाचा वापर करुन आपल्याला महाराष्ट्रात नेते होण्यापेक्षा स्वत:चे कतृत्व दाखवून मोठं व्हावं, दादांना बदनाम करुन, दादांना व्हिलन ठरवून आपण मोठे होणार नाहीत. उद्याचा निकाल आल्यानंतर काय परिस्थिती आहे हे समजेल, असा टोलाही आमदार सुनिल शेळके (Sunil Shelake) यांनी रोहित पवार यांना लगावला.