Baramati Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभा लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत निश्चित झाली आहे.आज महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान, महायुतीच्या प्रमुख नेत्यांची पुण्यात जाहीर सभा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, शिवसेनेचे नेते विजय शिवतारे महायुतीचे दिग्गज नेते सभेसाठी उपस्थित आहेत. यावेळी अजित पवार यांनी भाषणात शिवसेना नेते विजय शिवतारे यांचं कौतुक केलं. तसेच भाजपा नेत्यांना विनंती केली.
अजित पवार यांचे भाषण सुरू होते, त्यावेळी विजय शिवतारे यांनी ठाकरे गटाच्या कुलदीप कोंडे यांना व्यासपीठावर घेऊन आले. ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे समजताच अजित पवार यांनी शिवतारे यांचे आभार मानले.
देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक, बारामतीत यंदा भाकरी फिरवा; CM एकनाथ शिंदेंचं आवाहन
"विरोधक कसा असावा आणि मित्र कसा असावा लागतो तो पण विजयबापू शिवतारे यांच्याकडून शिका. एकदा मैत्री केली की पडेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल पण मैत्रिला अंतर पडू देत नाही अशा पद्धतीच काम विजयबापू शिवतारे यांच आहे, असं कौतुक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेना नेते विजय शिवतारे यांचं केलं.
अजितदादांनी भाजपा नेत्यांना केली विनंती
"माझी देवेंद्र फडणवीस यांच्या साक्षीने या मतदारसंघातील भाजपा नेत्यांना विनंती आहे की, कुठेही आपण कमी पडल्याच करता कामा नये. आम्ही पण इतर भागात कमी पडल्याच काम करणार नाही, शिवसेना पण करणार नाही. आरपीआयही करणार नाही. आपली आता चांगल्या पद्धतीने युती झाली आहे, त्याला दृष्ट लागू द्यायची नाही. आज एकनाथ शिंदे, विजय शिवतारे यांच्यामुळे बारामती लोकसभेत ताकद वाढली आहे, असंही अजित पवार म्हणाले.
"विरोधकांवर टीका करुन आपल्याला वेळ घालवायचा नाही, आपल्याला देशाचा विकास करायचा आहे. महाराष्ट्रात विकासगंगा पोहोचवत असताना निधी कमी पडणार नाही. तुम्ही कोणाच्या भावनिकतेला बळी पडू नका, असंही अजित पवार म्हणाले.
'विरोधक खोट बोलतात'
"विरोधक आता संविधान बदलणार, घटना बदलणार, निवडणूका होणार नाहीत, असं विरोधक खोट बोलत आहेत. मित्रांनो असं कधीही आपल्या देशात होणार नाही, मोदी साहेबांनी तर संविधान दिन साजरा करण्याच काम केलं आहे, हे मागील ७५ वर्षात कधीही झालेलं नाही ते मोदींनी केलं, असंही पवार म्हणाले.