लेकीच्या प्रेमापोटी शरद पवार धृतराष्ट्र झाले, सर्व सूनांचा अपमान केला - रुपाली ठोंबरे पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 04:57 PM2024-04-12T16:57:33+5:302024-04-12T16:58:23+5:30
सूना मूळ घराण्यातील नाहीत हे विधान अपमानास्पद आहे. शरद पवारांकडून अशा विधानाची अपेक्षा नव्हती असंही रुपाली ठोंबरे पाटील यांनी स्पष्ट केले.
पुणे - लेक लक्ष्मी तर सून महालक्ष्मी...ज्या शरद पवारांनी महिला धोरण आणलं त्यांच्याकडून समस्त सूनांचा अपमान करणारं विधान समोर आले. शरद पवार विसंगत भूमिका घेताना दिसले. लेकीच्या प्रेमापोटी शरद पवार धृतराष्ट्र झालेत हे खेदानं म्हणावं वाटतं. सुप्रिया सुळेंना मतदान करा असं आवाहन करा, पण जी सून तुमच्या घरात आली, कुटुंबात आली. तुमचे कूळ वाढवलं तिला मानसन्मान देण्याची वेळ येते तेव्हा तिला दुधातल्या माशीप्रमाणे बाहेर काढण्याचं शरद पवारांचं विधान होतं अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी केले आहे.
रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या की, शरद पवारांच्या विधानामुळे माताही दुखावल्या आहेत. हे शरद पवारांनी विधान केले हे दु:खद आहे. बारामतीची जनता हे पाहत आहे. बारामतीची निवडणूक भावनिक करण्यापेक्षा याठिकाणी १५ वर्ष तुम्ही खासदार आहोत. त्या भागात काय काय विकास केला हे सांगावे. आम्ही अजितदादांनी काय काय विकास केला हे सांगतोय. सुनेत्रा पवार या स्वत:साठी मते मागत आहेत. परंतु ही निवडणूक भावनिक करून राजकारणाचा दर्जा खालवला जातोय याचेही भान ठेवलं पाहिजे असं त्यांनी म्हटलं.
त्याशिवाय बारामती मतदारसंघातील जनता सुज्ञ आहे. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. अचानकपणे ज्यांनी महिला धोरण केले, त्यांनी मूळ पवार आणि बाहेरचे पवार हा मुद्दा येतोच कुठून? तुतारी गटाने यावर स्पष्टीकरण दिले पाहिजे. सूना मूळ घराण्यातील नाहीत हे विधान अपमानास्पद आहे. शरद पवारांकडून अशा विधानाची अपेक्षा नव्हती असंही रुपाली ठोंबरे पाटील यांनी स्पष्ट केले.
काय म्हणाले होते शरद पवार?
काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी जिथं पवार आडनाव दिसेल तिथे मतदान करा असं म्हटलं त्यावर पत्रकारांनी शरद पवारांना प्रश्न विचारला असता, मूळ पवार व बाहेरून आलेले पवार यांच्यात फरक आहे, असं वक्तव्य केले. पवारांनी कोणाचेही नाव घेतले नाही. मात्र, सुनेत्रा पवार यांच्याकडे त्यांचा रोख असावा, अशी चर्चा आहे.