पुणे: बारामतीची निवडणूक पवार विरुद्ध पवार अशी नसून पवार विरुद्ध सुळे अशी आहे. सुनेत्रा पवार याच निवडून येणार आहेत. बारामती लोकसभा निवडणुकीत आमच्या पक्षाने पैसे वाटप केले, असे म्हणणे हास्यास्पद असुन एक प्रकारे पराभवाची कबुली दिली, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी सांगितले.
राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, भाजपा प्रदेश प्रवक्ते संजय मयेकर, प्रसिध्दी सहप्रमुख हेमंत लेले, पुष्कर तुळजापूरकर आदी उपस्थित होते.सुनील तटकरे म्हणाले, " बारामती लोकसभा निवडणुकीवेळी माझी ही निवडणूक होती. त्यामुळे मी इकडे आलो नाही. अजित पवार स्वतः सक्षम आहेत, त्यांनीच यापूर्वीच्या निवडणुका जिंकून दिल्या आहेत. बारामतीचा अजित पवार यांना चांगला अभ्यास आहे. प्रफुल्ल पटेल यांनी स्वतः लक्ष घातले होते. बारामती निवडणुकीनंतर आढावा घेतला. चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबाबत तटकरे म्हणाले, " आमच्या पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी स्वतः त्याविषयी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. त्याविषयी अधिक बोलणे योग्य नाही. रुपाली चाकणकर यांनी भावनेच्या भरात ईव्हीएम मशीन पूजा केलेली असू शकते, त्यांच्याविरुद्ध गुन्हा देखील दाखल झालेला आहे. त्यांनी केलेली चूक ही चूकच आहे. महायुतीला ४५ पेक्षा जास्त जागा नक्कीच मिळतील असेही तटकरे यांनी सांगितले.
भाजपबरोबर सत्ता स्थापनेचा तीन वेळा निर्णय झाला होता. 2014 आणि 2016 मध्ये शिवसेना हा सत्तेमध्ये सहभागी असेल. शिवसेना आमचा जुना मित्र असल्यामुळे त्यांच्याबरोबरची युती तोडणार नाही असे गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले होते. 2019 ला ही बोलणी झाली होती. नंतर शिवसेनेसोबत सत्ते जाण्याचा निर्णय घेण्यात आला. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतरही भाजप सोबत जाण्याची चर्चा झाली होती असे असताना देखील जाणीवपूर्वक आता निवडणुकीत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे .भाजपसोबत जायला हवा असं राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेल्या प्रत्येक आमदारांनी सह्या करून पत्र दिले होते. मात्र आता त्यातीलच काही पत्रकार परिषदा घेऊन संभ्रम निर्माण करत आहे . त्यामुळे अन्य कारणासाठी पक्षातून बाहेर पडले असे म्हणण्यात काहीच अर्थ नाही असेही तटकरे यांनी सांगितले.
राहुल गांधी हे अपरिपक्व नेतृत्व
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान झाले तर देशाची राज्यघटना बदलली जाईल असे आरेाप करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे अपरिपक्व नेतृत्व आहे. 370 कलम, सीएए कायदा आदिविषयी अल्पसंख्यांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे, पण तो आम्ही दुर करीत असल्याचे सुनिल तटकरे यांनी सांगितले.