बारामती-लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर बारामतीत राजकीय वातावरण कधी नव्हे ते प्रथमच तापले आहे.बारामतीची एक ओळख असणार्या पवार कुटुंबातच हि निवडणुक होण्याची चिन्हे आहेत.बुधवारी (दि २१) उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काॅंग्रेस कार्यालयाला भेट देत कार्यकर्त्यांशी संवाद साधला.त्यापाठोपाठ दुसर्याच दिवशी गुरुवारी (दि २२) बारामतीत उपमुख्यमंत्री पवार यांचे धाकटे सुपुत्र जय पवार यांनी दाैरा सुरु केला.त्यामुळे यंदाची निवडणुकीची सुत्रे पवारांच्या तिसर्या पिढीच्या हाती गेल्याचे चित्र प्रथमच दिसुन येत आहे.
आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत खासदार सुप्रिया सुळे विरुध्द सुनेत्रा पवार अशी लढत होण्याचे स्पष्ट संकेत आहेत.खासदार सुळे यांनी शरद पवार गटाच्या वतीने उमेदवारी जाहीर केल्यात जमा आहे.तर अजित पवार यांनी महायुतीच्या जागावाटपानंतर उमेदवारी जाहिर करणार असल्याचे सांगितले आहे.मात्र, त्यांच्या गटाच्या वतीने जोरदार जनसंपर्क अभियान सुरु आहे.खुद्द अजित पवार यांच्या दोन सभा बारामतीत पार पडल्या आहेत.मात्र, उपमुख्यमंत्री पवार यांच्यावर संपुर्ण राज्याची जबाबदारी असल्याने बारामतीत जय पवार यांनी राजकीय सुत्रे हाती घेण्याची शक्यता आहे. युगेंद्र पवार यांनी कालच राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या पक्ष कार्यालयास सदिच्छा भेट दिली आहे.‘साहेबां’नी सांगितल्यास लाेकसभा मतदारसंघात दाैरे करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.त्यावरुन युगेंद्र पवार हे शरद पवार गटात सहभागी झाल्याचे मानले जात आहे.तसेच येत्या काही दिवसांत आमदार रोहित पवार देखील खासदार सुळे यांच्या प्रचारात उतरण्याची शक्यता आहे.
दरम्यान, जय पवार यांनी गुरुवारी (ता. 22) कसब्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयास भेट देत सोशल मिडीया सेलच्या पदाधिका-यांशी चर्चा करुन त्यांना काही सूचनाही केल्या. तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष जय पाटील, युवकाध्यक्ष अविनाश बांदल, सोशल मिडीयाचे तुषार लोखंडे, अमोल कावळे, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्या समवेत उपस्थित होते. त्या नंतर ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडीयमवर सुरु असलेल्या क्रिकेट सामना पाहण्यासाठी उपस्थित झाले होते. तेथे त्यांनी खेळाडूंशी चर्चा केली. या दरम्यान युवकांशी त्यांनी संवाद साधला. शहरातील एका हॉटेलमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांसमवेत नाश्ताही केला.
दरम्यान,युगेंद्र पवार यांनी शरद पवार गटाच्या कार्यालयाला दिलेल्या भेटीबद्दल जय पवार म्हणाले, परिवारात ज्याची जी पसंती असेल ते लोक त्यांचा प्रचार करतील. परिवारातील बाकीचे लोक कदाचित माझा प्रचार करणार नाहीत, असे अजित पवार यांनी आधीच सांगितले आहे. आपण दुसऱ्यांना बोलू शकत नाही. त्यांना ज्यांचा प्रचार करायचा आहे तो करू द्या, आपण आपला प्रचार करू. रॅली, पदयात्रा, भेटीगाठी, बैठका घेऊन नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करू.निवडणूकीला उभे राहणे किंवा निवडणूक लढणे या बाबींचा कधीही विचारही केलेला नसल्याचे त्यांनी नमूद करत या शक्यता फेटाळून लावल्या. सध्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
...कसब्यातील राष्ट्रवादी भवनमधुन शरद पवार गटाने सहित्य हलविलेलोकसभा निवडणुकीत आमनेसामने आल्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील संघर्ष टोकाला जाण्याची चिन्हे आहेत.गुरुवारी (दि २२) येथील राष्ट्रवादी काॅंग्रेस भवनमधील सहित्य शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी हलविले. येथील राष्ट्रवादी भवनमधुनच अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचे राजकीय कामकाज चालविले जात असे.सुळे यांच्या स्वीय सहायकाची येथे स्वतंत्र केबीन देखील होती.आता भिगवण चाैकातील नव्याने सुरु झालेल्या शरद पवार गटाच्या कार्यालयातून पक्षाचे कामकाज होण्याची शक्यता आहे.या कार्यालयातुन शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे फोटो काढुन टाकण्यात आले आहेत.त्यामुळे येथील सहित्य हलविण्यात आले.