Baramati Lok Sabha Result 2024 : देशाच्या राजकारणात कायम महत्त्वाचे स्थान राखलेल्या पवारांचे ‘होम पिच’ म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघ ओळखला जातो. गेल्या ४० वर्षांत राष्ट्रीय राजकारणात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नेहमीच महत्त्वाची राजकीय भूमिका बजावली. विशेषत: भाजप विरोधी मोट बांधण्यात, त्यांचा नेहमीच रणनीती आखण्यात सिंहाचा वाटा होता. त्यामुळे बारामती लोकसभा निवडणूक कायमच प्रतिष्ठेची राहिली आहे. यंदाची निवडणूक देखील त्याला अपवाद नव्हती. अजित पवारांनी बंडखोरी केल्यानंतर बारामतीत कोणाचं वर्चस्व येणार याकडे देशाचे लक्ष लागले होते. अखेर निवडणुकीत शरद पवारांनी दाखवून दिले कि बारामती ही आमचीच आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) १ लक्षणांपेक्षा अधिक मताने निवडून आल्या आहेत. त्यांनी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना पराभूत केले आहे.
मतमोजणीला सुरवातीपासून सुप्रिया सुळे आघाडीवर होत्या. अखेर सुप्रिया सुळे एक लाखांच्या फरकाने निवडून आल्या आहेत. अजितदादांनी सुरुवातीपासून बारामतीमध्ये खूप प्रचार केला होता. भावनिक होऊन जाऊ नका , कोणाचं ऐकू नका, माझंच ऐका अशी वक्तव्ये केली होती. बारामतीकर त्यांना साथ देतील असा विश्वासही अजित पवाराना होता. परंतु आता आलेल्या निकालावरून सगळं उलटच चित्र झाल्याचे दिसून आले आहे. अजित पवारांची बंडखोरी त्यांना महागात पडल्याचे या बारामती लोकसभेच्या निकालावरून दिसून आले आहे. बारामतीत सर्वत्र जल्लोषचे वातावरण आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याकडून गुलालाची उधळण करत, साहेबांचाय नावाने घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला जात आहे.
बारामतीवर थोरले की धाकटे पवार वर्चस्व राखणार याकडे दिल्लीपासून गल्लीचे लक्ष लागले होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांचे देखील राजकारणात स्वत:चे वेगळे स्थान आहे. वेळोवेळी मिळालेल्या राजकीय यशाचे हे स्थान नेहमीच अधोरेखित झाले आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्यासह ‘साहेब’ आणि ‘दादां’च्या राजकारणाचेच एका अर्थाने आज भवितव्य ठरणार होते. मतदारसंघात यंदा ६९.४८ टक्के मतदान झाले. हेच मतदान २०१९ मध्ये ७०.२४ टक्के झाले होते. त्यामुळे यंदा बारामतीच्या मतदानात ०.७६ टक्के घट झाली. भावनिकतेचा मुद्दा आणि विकासकामांच्या मुद्यासह पवार कुटुंबीयांनी एकमेकांवर केलेले आरोप यंदाच्या लोकसभेत चर्चेचा विषय ठरले.