बारामती लोकसभा निवडणुकीतील पराभव जिव्हारी; अजित पवार घेणार झाडाझडती?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 12:00 PM2024-06-07T12:00:00+5:302024-06-07T12:02:09+5:30
शहर आणि तालुक्यातील सर्वच संस्थांवर अजित पवारांचे एकहाती वर्चस्व असताना ही वेळ आली आहे. त्यामुळे अजित पवारांपासून तोंड लपविण्याची वेळ या पदाधिकाऱ्यांवर आली आहे.....
बारामती (पुणे) :बारामती लोकसभा निवडणुकीत महाविकास विकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे (supriya sule) यांना खडकवासला वगळता सर्वच विधानसभा मतदारसंघांत मताधिक्य मिळाले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांना १ लाख ६५ हजारांचे मताधिक्य बारामतीकरांनी दिले; मात्र यंदा लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना याच मतदारांनी डावलल्याचे वास्तव आहे. बारामतीत सुप्रिया सुळे यांना शहर आणि तालुक्यासह ३५ हजार २८१ मतांचे मताधिक्य दिले आहे. त्यामुळे बारामतीचे सुप्रिमो असणाऱ्या ‘अजितदादां’ना हा धक्का मानला जात आहे. शहर आणि तालुक्यातील सर्वच संस्थांवर अजित पवारांचे एकहाती वर्चस्व असताना ही वेळ आली आहे. त्यामुळे अजित पवारांपासून तोंड लपविण्याची वेळ या पदाधिकाऱ्यांवर आली आहे. (Baramati Lok Sabha Result 2024 Supriya Sule vs Sunetra Pawar)
बारामती नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद, सहकारी बँक, बारामती तालुका दूध संघ, सहकारी साखर कारखाने या बारामतीच्या अर्थकारणाशी संबंधित संस्था आहेत. या सर्व पदाधिकाऱ्यांची एकगठ्ठा ताकद पाठीशी असून देखील सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांची अजित पवार झाडाझडती घेण्याची अधिक शक्यता आहे. पक्षाचे बहुतांश पदाधिकारी, संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या भागात काही अपवाद वगळता सर्वच ठिकाणी सुप्रिया सुळे यांना अधिकचे मताधिक्य मिळाले आहे. ते एकूण मताधिक्य ३५ हजारांच्या पुढे गेले आहे. देशात लक्षवेधी असणारी ही निवडणूक सर्वार्थाने महत्त्वाची होती. दोन्ही उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होईल असे मानले जात होते; पण संपूर्ण लोकसभा मतदारसंघात दीड लाखापेक्षा सुळे यांना मिळालेले मताधिक्य बरंच काही सांगून जाते. अजित पवार गटात सर्व काही आलबेल नसल्याचे हे संकेत आहेत. पदे, प्रतिष्ठा सर्वकाही देऊन देखील मातब्बर समजले जाणारे शहर आणि तालुक्यातील संस्थेच्या बड्या नेत्यांचा प्रभाव ओसरला आहे का, अशी चर्चा रंगली आहे. अजित पवार यांनी याबाबत खोलात जात माहिती घेत बदल करण्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.
काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षपातळीवर देखील संघटनात्मक बांधणी करण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे. अजित पवार याबाबत येत्या काही दिवसांत खांदेपालट करण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे अजित पवार गटातील पदाधिकाऱ्यांमध्ये सध्या सुनेत्रा पवार यांच्या पराभवामुळे मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर अजित पवारांपासून तोंड लपविण्याची वेळ देखील आली आहे. ‘अजितदादा’ तिसरा डोळा उघडण्याच्या भीतीने हे पदाधिकारी चांगलेच धास्तावले आहेत.