Baramati Lok Sabha Result 2024| पुणे : दहाव्या फेरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) विक्रमी आघाडी घेतली आहे. या फेरीनंतर सुळे यांना ३ लाख २५ हजार ७२१ मते मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना २ लाख ७७ हजार ७८४ मते मिळाली. आतापर्यंत दहाव्या फेरीअखेरीस सुप्रिया सुळे यांना ४८ हजार ३६५ मतांची आघाडी मिळाली आहे.
एखादा अपवाद वगळता सकाळपासून सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बारामती विधानसभा मतदारसंघातूनही सुळे यांना मोठे मतदान झाले आहे. सुळे यांना आतापर्यंत ४८ हजारांचे लीड मिळाले आहे. हे लीड तोडणे सुनेत्रा पवारांना कठीण जाणार आहे. त्यामुळे अजित पवारांच्या आक्रमक प्रचाराला शरद पवार शह देण्याची शक्यता दिसत आहे. सध्या अजित पवारांचा राष्ट्रवादी काँगेसचा फक्त एकच उमेदवार आघाडीवर आहे. राजगड लोकसभा मतदारसंघातून सुनील तटकरे आघाडीवर आहेत.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांची रणनीती, तसेच त्यांना ८४ व्या वर्षी मिळणारी सहानुभूती की, मोदींचे ‘व्हिजन’सह अजित पवारांनी मार्गी लावलेली विकासकामे यामध्ये कोण बाजी मारणार, याचे उत्तर आजच्या निकालातून मिळणार आहे. पण सध्या तरी सुळे यांचा लीड पाहता पवारांचा जलवा कायम असल्याचे दिसत आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीसाठी संपूर्ण पक्षाची नव्याने बांधणी केली. यामध्ये पवार यांनी जुन्या सवंगड्यांना बरोबर घेत नव्याने राजकीय पदासह निवडणुकीची जबाबदारी दिली. संपूर्ण निवडणुकीची सूत्रे हाती घेत मतदारसंघ पिंजून काढला. कोणताही अनुभव नसलेल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी प्रथमच राजकीय रिंगणात उतरविले; तसेच पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार, तसेच सुळे यांच्या कन्या रेवती सुळे या प्रथमच प्रचारात सहभागी झाल्या. दुसरीकडे अजित पवार यांचे बारामतीच्या सहकारी संस्था, साखर कारखाने, दूध संघ, सहकारी बँकांवर वर्चस्व आहे. या सर्व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सुनेत्रा पवार यांच्या मतदानासाठी विभागून जबाबदाऱ्या घेतल्या. या सर्वांवर अजित पवार स्वत: लक्ष ठेवून होते.