पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अभूतपूर्व फाटाफूट झाल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघात कोण विजयी होणार? याकडे केवळ राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागून होते. त्यानंतर चुरशीच्या झालेल्या लढतीत सुळे यांनी मतमोजणीत पहिल्या फेरीपासून आघाडी घेतल्यानंतर त्यांना किती मताधिक्य मिळते, याची उत्सुकता सर्वांनाच लागून होती. मात्र, मतदारांनी ‘लोकसभेत ताईच आणि विधानसभेत दादा’ असे समीकरण डोक्यात ठेवूनच सुप्रिया सुळे यांना तब्बल १ लाख ५३ हजार ९६० मतांची आघाडी दिली. यात महत्त्वाचे म्हणजे बारामती विधानसभा मतदारसंघातून सुळे यांना तब्बल ४८ हजार १६८ मतांची आघाडी मिळाली.
आचारसंहिता लागल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे सुळे यांना तब्बल दोन महिन्यांचा काळ प्रचारासाठी मिळाला. त्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. अजित पवार यांनी आपल्या प्रचारातून शरदचंद्र पवार गटाकडून भावनिक आवाहन केले जाईल, मात्र मतदारांनी या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन केले होते. मात्र, मतदारांनी या आवाहनाला प्रतिसाद न देता ‘लोकसभेला ताई व विधानसभेला दादा’ असे समीकरण डोक्यात ठेवूनच मतदान केल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
सुप्रिया ठरल्या जिरायती अन् ‘बागायतीं’ दाेन्हीमध्ये प्रिय
बारामती विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना तब्बल ४८ हजार १६८ मतांची आघाडी मिळाली आहे. सुरूवातीच्या फेऱ्यांमधून ग्रामीण भागातील मतपेट्या उघडण्यात आल्या. त्यात सुळे यांना मताधिक्य मिळत होते. मात्र, बारामतीचा जिराईत भाग हा कायमच शरद पवारांना साथ देतो, असे अजित पवारांचे कार्यकर्ते ठामपणे सांगत होते. बागायती भाग व बारामती शहरात सुनेत्रा पवार यांना चांगले मताधिक्य मिळेल, अशी आशा त्यांनी होती. मात्र, त्यांची ही आशा फोल ठरली. बारामती शहरासह बागायती भागातूनही सुप्रिया सुळे यांना मोठे मतदान झाल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
२२ व्या फेरीत सुनेत्रा पवार यांना केवळ ७० मतांची आघाडी
अजित पवार यांच्या एका कार्यकर्त्याची यावेळी प्रतिक्रिया अतिशय बोलकी होती. अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीत उभे करू नये, त्यात त्यांचा पराभव नक्की होईल, असे सहा महिन्यांपूर्वीच मी त्यांना सांगितले होते. मात्र, अजित पवार यांनी ते अमान्य केले आणि त्यामुळेच हा पराभव झाल्याचे त्यांचे म्हणणे होते. बारामती विधानसभा मतदारसंघात २२ फेऱ्यांमध्ये मोजणी झाली. त्यातील शेवटच्या २२ व्या फेरीत एका मतदान केंद्राचे मतदान मोजण्यात आले. त्यात पवार यांना केवळ ७० मतांची आघाडी मिळाली. या मतदारसंघात हाच अपवाद ठरला. सुळे यांना २१ फेऱ्यांमध्ये मताधिक्य आहे.
भाेर मतदारसंघानेही दिले मताधिक्य
बारामतीनंतर भोर विधानसभा मतदारसंघाने सुळे यांना ४१ हजार ६२५ मतांची आघाडी दिली. शरद पवार यांचा अनंतराव थोपटे यांना भेटण्याचा डाव अतिशय यशस्वी ठरला. यापूर्वी थोपटे व पवार यांच्या संघर्षातून भोर मतदारसंघातून सुळे यांना कधीही मताधिक्य मिळाले नव्हते. या भेटीनंतर भोर मतदारसंघाने बारामती मतदारसंघानंतर सर्वांत मोठे मताधिक्य दिले.
शिवतारे पवारांकडे अन् कार्यकर्ते सुळेंकडे
पुरंदर विधानसभा मतदारसंघात संजय जगताप काॅंग्रेसचे आमदार असल्याने नैसर्गिक पद्धतीने सुळे यांना मताधिक्य मिळेल, असे अपेक्षित होते. निवडणुकीदरम्यान शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी अजित पवारांविरोधात बंड थोपटले होते. मात्र वाटाघाटींनतर त्यांनी नमते घेतले. तरीदेखील कार्यकर्त्यांनी बापू, तुम्ही तुमचे काम करा आम्हाला आमचे काम करू द्या, अशी थेट समज दिल्याची चर्चा यावेळी रंगली होती. परिणामी, पुरंदर मतदारसंघातूनदेखील सुळे यांना ३४ हजार ३८७ मतांची आघाडी मिळाली.
सुनेत्राताईंना इंदापूर अन् दाैंडनेही दिला दगा
इंदापूर आणि दौंड हे दोन्ही मतदारसंघ सुनेत्रा पवार यांना पूरक मानले जात होते. मात्र इंदापूरमधून २५ हजार ६८९ तर दौंडमधून २५ हजार ५३१ मतांची आघाडी सुळे यांना मिळाली आहे. या आकड्यांवरून राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे व दौंडचे आमदार राहुल कुल यांची कामगिरी अपयशी ठरल्याचे दिसून आले आहे. कार्यकर्त्यांच्या सांगण्यानुसार राहुल कुल यांच्या राहू या गावातही तुतारीचाच बोलबाला होता. अजित पवार गटाचे माजी आमदार रमेश थोरात यांच्या खुटबाव या गावातही तुतारीच आघाडीवर असल्याचे सांगण्यात आले.
‘खडकवासला’त पवारांनी २१ हजारांची आघाडी
सुनेत्रा पवार यांना एकमेव दिलासादायक निकाल हा खडकवासला विधानसभा मतदारसंघातून मिळाला आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघात शहरी मतदार असल्याने तसेच याठिकाणी भाजपचे विद्यमान आमदार असल्याने सुनेत्रा पवार यांना २१ हजार ६९६ मतांची आघाडी मिळाली. त्यातही खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या ग्रामीण भागातून तुतारीचीच चलती दिसून आली. मात्र सिंहगड रोड, धायरी, कोथरूडचा काही भाग, नांदेड सिटी या परिसरात घड्याळाला आघाडी मिळाल्याचे दिसून आले. खडकवासला विधानसभा मतदारसंघात एकूण २४ फेऱ्या होत्या. त्यातील तब्बल १६ फेऱ्यांमध्ये पवार यांना आघाडी मिळाली.