Supriya Sule ( Marathi News ) :बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबात मोठा राजकीय संघर्ष सुरू आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्यमान खासदार आणि यंदाच्या निवडणुकीतील उमेदवार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात त्यांचे बंधू व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या रिंगणात उतरल्या आहेत. सुप्रिया सुळे या आपला बालेकिल्ला कायम ठेवण्यासाठी, तर अजित पवार हे पत्नीला विजयी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशातच दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अजित पवार यांनी काल बारामतीतील सभेत खळबळजनक गौप्यस्फोट करत शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी लोकसभेची उमेदवारी मागे घेऊ नये, यासाठी काही लोकांनी रात्रीचे फोन केले, असा दावा केला. अजित पवारांचा रोख सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे असल्याचं बोललं जातं होतं. त्यामुळे या आरोपांना आज सुप्रिया सुळे यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिलं आहे.
अजित पवार यांच्या आरोपाविषयी पत्रकारांनी प्रश्न विचारला असता "मला याची माहिती नाही. पण ते फोन करणारे कोण नेते आहेत, ते जाणून घ्यायला मलाही आवडेल," असं स्पष्टीकरण सुप्रिया सुळे यांनी दिलं आहे.
आरोप करताना अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?
अजित पवारांच्या उपस्थितीत काल बारामतीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी अजित पवार म्हणाले की, "पुरंदरमध्ये विजय शिवतारे आता आपल्यासोबत आहेत. ते ११ तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझी सभा घेत आहेत. उमेदवारी मागे घेऊ नये म्हणून शिवतारे यांना आलेले फोन त्यांनी मला दाखवले," असा दावा अजित पवारांनी केला. तसंच यावेळी ते भावुक होत म्हणाले की, "ते फोन नंबर बघून मला इतकं वाईट वाटलं की कोणत्या पातळीवर राजकारण सुरू आहे. त्यांनी ते फोन नंबर मला दाखवले, एकनाथ शिंदेंना दाखवले आणि देवेंद्र फडणवीसांनाही दाखवले. मी ज्यांच्यासाठी जीवाचं रान केलं, बाकी काही बघितलं नाही, त्यांच्याकडून माझ्या बाबतीत असं राजकारण सुरू आहे," असा हल्लाबोल अजित पवारांनी केला होता.
दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या स्पष्टीकरणानंतर अजित पवार हे विजय शिवतारेंना ज्या नंबरवर फोन आले होते, ते नंबर सर्वांसमोर आणणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.