सांगवी : बारामतीच्या गुन्हेशोध पथकाने बेकायदेशीर पिस्तुल विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला जेरबंद केले होते. मात्र आता परत एकदा पिस्तुल पुरवणाऱ्या म्होरक्यासह बारामती तालुका गुन्हेशोध पथकाने ५ जणांना अटक करत त्यांचाकडून एकूण ५ पिस्तुल व १० राउंडस हस्तगत जप्त केले आहे. गुन्हेशोध पथकाने विविध गुन्हे दाखल करत ११ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून १२ पिस्तूलसह २० राऊंडस हस्तगत केले आहेत. तर यापूर्वीच मध्यप्रदेशमधून गुन्हेगारी टोळ्यांना पिस्तुल पुरवणाऱ्या म्होरक्याला देखील गुन्हेशोध पथकाने ताब्यात घेतले आहे. मागील आठवड्यात ७ पिस्तुलसह १० राउंडस हस्तगत करून आरोपींना अटक केल्यानंतर सदर गुन्हयाचा तपास सुरू असताना काही संशयित आरोपी बारामतीत पिस्तुल विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशिर माहिती गुन्हेशोध पथकाला माहिती मिळाली होती. त्याअनुषंगाने पाच संशायातीना बारामतीतून ताब्यात घेवून कसून चौकशी करण्यात आली. या चौकशी नंतर ५ आरोपींकडून आणखी ५ पिस्तुल व १० राउंडस मिळून आले आहेत.
याबाबत आरोपी हनुमंत अशोक गोलार (वय २२ ) रा.जवळवाडी,खरवंडी कासार ता.पाथर्डी. जि.अहमदनगर ), अल्ताफ सज्जद पठाण (वय ३०) रा. नाईकवाडी मोहल्ला,ता.शेवगाव. जि.अहमदनगर), संतोष प्रभाकर कौटुंबे, (वय ३८) रा. मारवाड गल्ली ता. शेवगाव जि. अहमदनगर), जफर अन्सार इनामदार (वय २८) रा.नाईकवाडी मोहल्ला. ता. शेवगाव जि. अ. नगर), जावेद मुनीर सय्यद (वय २२ )रा.आखेगाव रोड,भापकर वस्ती, ता.शेवगाव. जि.अहमदनगर) यांच्या विरोधात भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. गुन्हेशोध पथकाने लागोपाठ केलेल्या धडक कारवाई नंतर आता गुन्हेगारी जगतात खळबळ उडू लागली आहे. मागील आठवड्यात बारामतीत जेवणाच्या बिलावरून हॉटेल चालकाला झालेल्या मारहाणीतून अनोळखी इसमांवर जबरी चोरी, खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासात पिस्तुल पुरवणाऱ्या गुन्हेगारांचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले होते. त्यानुसार परराज्यातून बेकायदेशीररीत्या पिस्तुल आणून महाराष्ट्रातील गुन्हेगारी टोळ्यांना पिस्तुल पुरवणाऱ्या रॅकेटचा सुगावा लागताच बारामतीत पर्दाफाश करून गुन्हे शोध पथकाने आदिनाथ ईश्वर गिरमे (वय २१) रा.पाटस ता.दौंड जि.पुणे), विजय रामदास कराड (वय २०) रा.टेंबुर्णी ता. शिरूर जि.बिड ) अमोल रमेश गर्जे वय २२ रा. शिरसठवाडी ता.पाथर्डी जि.अहमदनगर ) ३ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ७ पिस्तुलसह १० जिवंत काडतुसे असा एकूण सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. त्यानंतर आरोपीची चौकशी केली असता त्यांच्या इतर साथीदारांकडे पिस्तुल असल्याची कबुली दिली. त्यांनतर गुन्हेशोध पथकाचे प्रमुख योगेश लंगुटे यांनी पथकाला घेऊन आरोपींची शोधमोहीम सुरु केली. अशा प्रकारे आता पर्यंत ११ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून १२ पिस्तुल व २० रांउडस हस्तगत करण्यात आलेले आहेत.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, बारामतीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्दर्शनाखाली बारामती तालुका गुन्हेशोध पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलीस हवालदार दादा ठोंबरे,राहुल पांढरे,विजय वाघमोडे,पोलीस कॉन्स्टेबल नंदू जाधव,विनोद लोखंडे,मंगेश कांबळे,दत्तात्रय मदने, यांनी ही कारवाई केली आहे. आजची तरुणाई स्वत: चे आकर्षण व दहशत निर्माण होण्यासाठी विनापरवना व अल्पदरात मिळणाऱ्या पिस्तुलांचा सर्रास वापर करताना दिसू लागले आहे. यामुळे गुन्हेगारी वाढीस लागली आहे. यापुढे विनापरवाना पिस्तुल वापराणारा इसम आढळून आल्यास तात्काळ तालुका पोलिसांशी संपर्क साधावा. नाव सांगणाऱ्या नागरिकांचे नाव गोपनीय ठेऊन त्यांना त्यांना योग्य बक्षीस देण्यात येईल. - मिलिंद मोहिते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक,बारामती.