अन्नसुरक्षा अधिका-यांनी
केली अचानक तपासणी
दोघाजणांवर गुन्हा दाखल : अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांनी केली अचानक तपासणी
---
बारामती : बारामती एमआयडीसीतील एका कंपनीला भेसळयुक्त दूध विक्री केल्याचा प्रकार उघड झाला आहे. अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांनी अचानक केलेल्या तपासणीमुळे दूधभेसळ उजेडात आली. या कारवाईत जामखेड आणि विडणी येथील दोघाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैभव दत्तात्रय जमकावळे (खर्डा, ता. जामखेड, जि. अहमदनगर) आणि संपत भगवान ननावरे (रा. विडणी, ता. फलटण, जि. सातारा) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुण्याच्या अन्नसुरक्षा विभागाला दूधात भेसळ केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सुरक्षा अधिकारी एस. बी. अंकुश यांच्या मार्गदर्शनाखाली यासंबंधी गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार बी. ए. शिंदे, सहाय्यक आयुक्त ए. जी. भुजबळ, जिल्हा दूध विकास अधिकारी राजेंद्र कांबळे यांच्या पथकाने कंपनी मालकासमवेत टॅंकरची (एमएच-११, एएल-५९६२ ) तपासणी केली. टँकरमध्ये साडेआठ हजार लिटर गाईचे दूध होते. त्यातील दूधाचे सॅम्पल लॅबमध्ये तपासल्यावर मानदाप्रमाणे दूध नसल्याचे आढळून आले. दूधामध्ये डिटर्जंट भेसळ असल्याचे आढळले. दूध कोठून आले याची चौकशी केल्यावर टॅंकर चालक ननावरे यांनी हे दूध शिवकृपा दूध संकलन व शीतकरण केंद्र, खर्डा येथून आणले असल्याचे सांगितले. याबाबात संकलन केंद्राचे मालक व टॅंकर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश विधाते अधिक तपास करीत आहेत.
—————————————————