बारामती (पुणे) :बारामती शहर सबजेल आता बारामती जिल्हा कारागृह वर्ग ३ म्हणून ओळखले जाणार आहे. याबाबत राज्य शासनाने बारामती शहर, सबजेल बांधकामाच्या १४ कोटी ९६ लाख ३ हजार रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून बारामतीत पोलिस दल आधुनिक आणि सुसज्जतेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. शहरालगतच्या बऱ्हाणपूर येथे यापूर्वीच ६६.१३ एकर जागेवर पोलिस उपमुख्यालयाची आधुनिक इमारत बांधण्यात आली आहे. शिवाय शहरात शहर पोलिस ठाणे, पोलिस वसाहत, अपर पोलिस अधीक्षक कार्यालय, वाहतूक पोलिस कार्यालयाची सुसज्ज इमारत उभारण्यात आली आहे. शिवाय गोजूबावी येथील ७ हेक्टरवर ५० श्वान प्रशिक्षण क्षमतेच्या श्वान प्रशिक्षण केंद्रास देखील मंजुरी मिळाली आहे.
शहरात वाढत्या नागरीकीकरणाबरोबरच न्याय व्यवस्थेवर ताण वाढत आहे. त्यामुळे नवीन कारागृह निर्मितीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी ३१ पदांची मंजुरी मिळाली आहे. यामध्ये जिल्हा कारागृह अधीक्षक वर्ग २, प्रशासन अधिकारी, वैद्यकीय अधिकारी वर्ग ३, तुरुंग अधिकारी श्रेणी १, तुरुंग अधिकारी श्रेणी २, कार्यालयीन अधीक्षक, वरिष्ठ लिपिक, लिपिक, सुभेदार, हवालदार, कारागृह शिपाई, परिचारक या पदांचा समावेश आहे.
कारागृहातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास कारागृह परिसरातील अधिकारी, कर्मचारी यांना तातडीने कर्तव्यावर बोलावून परिस्थिती आटोक्यात आणण्याकरिता कारागृह परिसरातच शासकीय निवासस्थान असणे आवश्यक आहे. त्यामुळे कारागृह नियमावलीतील तरतुदीनुसार कारागृहाची बंदी क्षमता कमी करून संबंधित निवासस्थानेदेखील याच भूखंडामध्ये बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे, आता बारामती जिल्हा कारागृह वर्ग-२ ची बंदी क्षमता १३० इतकी होणार आहे. त्यामुळे या कारागृहास बारामती जिल्हा कारागृह वर्ग-३ म्हणून घोषित करण्याबाबतचा निर्णय राज्य शासनाने नुकताच जाहीर केला आहे.