बारामती: कोणत्याही संस्था या नेटक्या व स्वच्छ कारभाराच्या असाव्यात. लोकांच्या मनात विश्वास निर्माण होईल असे काम या संस्थांमधून झाले पाहिजे, असे मत ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांनी व्यक्त केले. बारामती पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन शुक्रवारी ( दि. 19) ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते झाले. यानंतर झालेल्या उद्घाटन समारंभात मध्ये ते बोलत होते.
पवार पुढे म्हणाले, राज्याच्या अनेक भागातून वेगवेगळ्या प्रशासकीय इमारतींसाठी माझ्याकडे अनेक लोक येत असतात. नूतन इमारतीची मागणी करताना बारामतीमध्ये जशी इमारत आहे तशी इमारत आम्हाला द्या. असे आवर्जून सांगतात. आज बारामती पंचायत समितीची इमारत पाहिल्यानंतर या बारामती पॅटर्नची माझी खात्री पटली. अशी इमारत पाहिल्यानंतर आगामी पंचायत समितीची निवडणूक ही सोपी असणार नाही. कारण प्रत्येकालाच इथे येण्याचा मोह होणार आहे.
यावेळी बोलताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, माझ्या खात्याअंतर्गत बारामती पंचायत समितीसारखी इमारत उभी राहिली याचा मला अभिमान वाटतो. लोकसंख्येने मोठ्या असलेल्या गावांसाठी नगरोत्थान सारखी योजना आगामी अर्थसंकल्पात आणावी यासाठी आम्ही ग्रामविकास विभागातर्फे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री असलेल्या अजित पवार यांना प्रस्ताव देणार आहोत. पंचायत समिती ही कार्यकर्ते घडवणारी शाळा आहे. बारामती पंचायत समितीची इमारत पाहून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये बारामती मधून इच्छुकांची संख्या वाढणार, त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कसोटी लागेल, अशी मिश्किल टिप्पणीही ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.
यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, बांधकाम सभापती प्रमोद काकडे, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, करण असोसिएट चे करण वाघोलीकर, कुणाल वाघोलीकर, उपसभापती रोहित कोकरे आदी उपस्थित होते. आभार पंचायत समितीच्या सभापती नीता फरांदे यांनी मानले.पुढील काही दिवसात जिरायती भागात पाणी प्रश्न सुटलेला असेल...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती मध्ये सुरू असणाऱ्या विकासकामांचा आढावा घेत. अनेक प्रकल्पांची माहिती दिली. ते म्हणाले ' आगामी काळात देखील बारामतीसाठी अनेक प्रकल्प योजना नियोजित आहेत. त्या सर्व कामांचे नियोजन ठिकाणी सांगणार नाही. नाही तर ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ व राज्यमंत्री भरणे म्हणतील की अजित पवार हे फक्त बारामतीच्या अर्थमंत्री आहेत काय? पवार पुढे म्हणाले, आज पर्यंत बारामतीतील विरोधकांनी जिरायत पट्ट्यातील पाणी प्रश्नावरुन राजकारण केले. आगामी काळात जिरायत पट्ट्यातील पाणी योजना पूर्ण करून पन्नास वर्षापासून असलेला हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार आहे. त्यामुळे येथून पुढे कोणी तुम्हाला पाणी मिळालं का असं सांगायला येणार नाही.