बारामती-फलटण-लोणंद रेल्वेमार्ग एप्रिलअखेर; वीस वर्षांपासून रखडले होते काम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 11:29 AM2020-03-06T11:29:03+5:302020-03-06T11:35:32+5:30
बारामती-फलटण-लोणंद रेल्वेमार्गाच्या कामाला गती देण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
रविकिरण सासवडे -
बारामती : बारामती-फलटण-लोणंद रेल्वेमार्गाचे बारामती तालुक्यातील भूसंपादन एप्रिलअखेर पूर्ण करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. तीन-चार महिन्यांपूर्वी लाटे व माळवाडी या गावांचे भूसंपादन प्रशासनाच्या वतीने पूर्ण करण्यात आले आहे. या गावांमधील ३२ हेक्टर २० आर क्षेत्र संपादित करण्यात आले आहे. यामधील १३७ बाधितांना ४१.१७ कोटी रुपयांचा मोबदला देण्यात आला आहे.
३१ ऑक्टोबर २०१८ पासून या रेल्वेमार्गाच्या भूसंपादनाला सुरुवात करण्यात आली होती. यानंतर दोन गावांचे भूसंपादन करण्यात आले आहे. जानेवारी महिन्यात बारामती-फलटण-लोणंद रेल्वेमार्गाच्या कामाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. या वेळी मंत्रालयात खासदार सुप्रिया सुळे, पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, वरिष्ठ रेल्वे अधिकारी यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत या कामाचा आढावा घेण्यात आला होता. बारामती-फलटण-लोणंद या एकूण ६३ किलोमीटरपैकी ३७.२० किलोमीटर रेल्वेमार्ग बारामती तालुक्यातून जातो. या संदर्भात भूसंपादनासाठी २३९ कोटी रुपयांची आवश्यक आहे. भूसंपादनासाठी प्रशासनाला ११५.५७ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. तर, प्रशासनाने १२४.०२ कोटी रुपयांची शासनाकडे मागणी केली आहे.
वीस वर्षांपासून या रेल्वेमार्गाचे काम रखडले होते. बारामती तालुक्याच्या बागायती भागातून हा रेल्वेमार्ग जात असल्याने मध्यंतरी जिरायती भागाचा सर्व्हे करण्यात आला. त्यानुसार, बारामती तालुक्यातील १३ गावांमधून हा रेल्वेमार्ग जाणार आहे. दक्षिण भारताला जोडणारा सर्वांत जवळचा मार्ग म्हणून या रेल्वेमार्गाचे महत्त्व आहे. बारामती तालुक्यातील लाटे, माळवाडी, कुरणेवाडी, खामगळवाडी, बऱ्हाणपूर, कटफळ, नेपतवळण, सोनकसवाडी, ढाकाळे, थोरटेवाडी, कºहावागज, सावंतवाडी, तादूळवाडी आदी गावांमधून हा रेल्वेमार्ग जातो. यापैकी लाटे, माळवाडी गावांमधील भूसंपादन खासगी वाटाघाटीने पार पडले आहे.
नेपतवळण, तांदूळवाडी, सावंतवाडी, बऱ्हाणपूर आदी गावांच्या मूल्यांकनासाठी बुधवारी (दि. ४) जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. थोपटेवाडी, सोनकसवाडी गावांची कागदपत्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. तर, कऱ्हावागज, कटफळ आदी गावांची कागदपत्रे प्रसिद्ध होणे बाकी आहे. मात्र, यामध्ये कुरणेवाडी, ढाकाळे, खामगळवाडी, थोपटेवाडी आदी गावांचा भूसंपादनाला विरोध आहे. बारामती तालुक्यातील नेपतवळण, ढाकाळे, लाटे या ठिकाणी रेल्वे स्थानके विकसित करण्यात येणार आहेत.
............
भूसंपादनाची सद्य:स्थिती
एकूण लांबी : ६३.६५ किमी
बारामती तालुक्यातील : ३७.२० किमी
बाधित गावे : १३
संपादन करायचे क्षेत्र : १८०.५५ हेक्टर
संपादित क्षेत्र : ३२.३१ हेक्टर
शिल्लक क्षेत्र : १४८.२४ हेक्टर
एकूण गट : ३१२
संपादित गट : ५१
शिल्लक गट : २६१
एकूण खातेदार : २,६३८
संपादित खातेदार : १३७
शिल्लक खातेदार : २,५०१
............
भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच संपूर्ण रेल्वेमार्गाचे भूसंपादन करण्याचा प्रयत्न आहे. - दादासाहेब कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती.
.......