सांगवी : मुसळधार पाऊस व दररोज होणारी जड वाहनांची वाहतूक यामुळे बारामती - फलटण रस्त्यावर मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे वाहने घसरून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. बारामती - फलटण रस्त्यावरून दररोज छोट्या- मोठ्या वाहनांसह हजारो प्रवाशांची ये- जा होत असते. मात्र, पाहुणेवाडी स्मशानभूमी जवळील ररस्त्यावर डबक्याच्या आकाराचे दोन भले मोठे खड्डे तयार झाले असून, सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत.
त्यात पावसाचे पाणी साचून राहात असल्याने डबके व चिखलाचे साम्राज्य दिसून येत आहे. रस्त्यांची दुरुस्ती केली जात नसल्याने खड्डे व चिखल आंधळ्या प्रशासन व लोकप्रतिनिधींना दिसत नसल्याच्या प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांसह दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी व्यक्त केल्या आहेत. याच ठिकाणी दरवर्षी हीच अवस्था कायम असल्याने प्रशासन ठोस उपाययोजना करण्यासाठी पुढे येत नाही. खड्ड्यांना वैतागलेल्या नागरिकांनी अनेकदा अधिकारी व लोकप्रतिनिधींना निवेदने देऊन तसेच आंदोलन करून रस्ते दुरुस्त करण्याची मागणी केली. परंतु, कुणीही या मागणीकडे गांभीर्याने बघितले नाही.
मनस्तापामुळे नागरिक त्रस्त
पाऊस झाल्यानंतर बारामती-फलटण रस्त्यांवरून वाहनाने जाताना वाहनांच्या चाकांमुळे रोडवरील डबक्यांमधील गढूळ पाणी व चिखल अंगावर उडत असल्याने कपडे खराब होतात. तर नवीन प्रवाशांची मोठी हेळसांड होत असून, याच खड्ड्यांमधून मार्ग काढताना दुचाकीचालक रोज एकमेकांच्या अंगावर जात असल्याने त्यांना दुखापत तर इतर नागरिकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागतो.