बारामती: बारामतीत बुधवारी (दि ५) मध्यरात्रीपासुन सात दिवस कडक लॉकडाऊनला सुरवात झाली. नागरिकांनी या लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिल्याने बारामती निर्मनुष्य झाल्याचे पाहावयास मिळाले. पोलिसांनी शहरात येणाऱ्या सर्व रस्त्यांची नाकाबंदी केली आहे.तसेच शहरात येणाऱ्या सर्व वाहनांची कसून तपासणी सुरु आहे. पोलिसांनी आज विनाकारण फिरणारी ३० वाहने जप्त केली.तसेच दोन दुकाने सील केली आहेत.
शहरात १ उपविभागीय पोलीस अधिकारी, १२ अधिकारी व १२० कर्मचारी,राज्य राखीव दलाच्या तुकडीसह ४० गृहरक्षक दलाचे जवान नियुक्त केले आहेत.
बारामती शहरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्यात आले आहे. सर्वच रस्त्यांची नाकाबंदी करण्यात आली आहे. अंतर्गत रस्त्यांवर बॅरेगेट्स लावण्यात आले आहेत.
पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, आज विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांकडुन १५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच ३० वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.एका वाईन शॉपसह किराणा दुकान सील करण्यात आले आहे. काही मेडीकल दुकाने औषधांच्या नावाखाली बिस्कीट,चिप्स आदी सहित्य विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या दुकानांनी केवळ औषधांची विक्री करावी.औषधाच्या नावाखाली इतर विक्री केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक शिंदे यांनी दिला आहे.———————