बारामती : गाढवांची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा बारामती शहर पोलिसांनी पकडले आहे. सुमारे १५ गाढवांना घेऊन जाणारा आंध्रप्रदेश येथील आयशर टेम्पो पाठलाग करून पोलिसांनी पकडला. शनिवारी (दि. ११) रात्रीच्या सुमारास लोणंद (ता. फलटण) येथे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकास ताब्यात घेण्यात आले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.
बारामती शहर पोलिसांनी शनिवारी (दि. ११) रात्री गाढवांची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा छडा लावला आहे. या कारवाईत आयशर टेम्पो (क्रमांक ए.पी. ३९ टी. ७५०३) ताब्यात घेण्यात आला आहे. तसेच या टेम्पोमध्ये असणाऱ्या १५ पैकी १३ गाढवांची देखील पोलिसांनी सुटका केली आहे. तर २ गाढवे मृत अवस्थेत अढळली. ही टोळी आंध्र प्रदेशातील असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ते रात्रीच्या वेळी फिरुन गाढवांना भुलीचे इंजेक्शन देऊन त्यांची तस्करी करत होते. यातील मुख्य आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान ज्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे, त्याची भाषा पोलिसांनी कळत नसल्याने चौकशी करण्यात अडथळा येत असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले.
पोलीस निरीक्षक मानसिंह खोचे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरिक्षक योगेश शेलार, सतीश अस्वर, पोलीस कॉन्स्टेबल नितीन जगताप, रुपेश साळुंखे, नूतन जाधव, अजित राऊत, तुषार सानप, पोपट नाळे, तुषार चव्हाण यांनी सदर टोळीचा पाठलाग करून सातारा जिल्ह्यातील लोणंद येथे आरोपी सह ट्रक पकडला आहे. याबाबत बारामती शहर पोलीस ठाण्यात बारामती येथील वडार समाजाच्या वतीने सदर आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच मेलेल्या दोन गाढवांचा नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. याबाबत बारामती शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक योगेश शेलार अधिक तपास करीत आहेत.