बारामती: महिलादिनी शहर पोलीस ठाण्याचा ‘चार्ज’ मिळालेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी धडाकेबाज कामगिरी केली आहे. ‘हनी ट्रॅप’ चा सापळा लावुन लाखोंची खंडणी मागणारी टोळी या महिला पोलीस अधिकाऱ्याने गजाआड केली आहे.
पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी याबाबत अधिक माहिती दिली.त्यानुसार कमला शंकर पांडे (वय ४५, रा.अशोकनगर,बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार राके श रमेश निंबोरे (वय २४,रा.साखरवाडी,ता.फलण,जि.सातारा), स्मिता दिलीप गायकवाड (वय २३,रा.फलटण,जि.सातारा),आशिष अशोक पवार (वय २७, रा.भुर्इंज, ता.वाई, जि.सातारा),सुहासिनी अशोक अहिवळे (वय २६, रा.मंगळवार पेठ ,फलटण,जि.सातारा) या चौघा जणांना अटक केली आहे.
आरोपी स्मिता हिने मोबाईल फोनवरुन फिर्यादी पांडे यांच्याशी ओळख निर्माण केली. तसेच २७ फेब्रुवारी रोजी फिर्यादीला फलटण येथे बोलावुन घेतले. तिच्या फ्लॅटवर तिची अनोळखी मैत्रीण आणि आशिष पवार, राकेश निंबोरे(गुरु काकडे) यांनी फिर्यादीला महिला अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवली.तसेच ५ लाख रुपये खंडणीची मागणी केली. त्यानंतर फिर्यादीकडे १ लाख रुपये घेवुन आणखी ४ लाख रुपये बारामतीत घेण्यास येत असल्याचे त्यास सांगितले.
त्यावर घाबरलेल्या फिर्यादीने शहर पोलीस ठाणे गाठले.त्या दिवशी महिला दिनी महिला पोलीस अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी शेंडगे याच्याकडे पोलीस ठाण्याचा ‘चार्ज’ होता. त्यांनी फिर्यादी पांडे याच्या तक्रारीची दखल घेत पोलीस पथक तयार केले.या पथकाने सापळा रचत बारामती बसस्थानकात आरोपी निंबोरे यास सिनेस्टाईलने पाठलाग करत पकडले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत इतर आरोपींची नावे निष्पन्न झाली. आरोपी पवार हा बडतर्फ पोलीस आहे.तो कुरार (बृहन्मुंबई) येथील पोलीस ठाण्यात होता.तर निंबोरे हा सराईत गुन्हेगार असुन त्याच्यावर लोणंद,फलटण पोलीस ठाण्यात एकुण ११ गुन्हे दाखल आहेत.