सांगवी: बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने वर्षभरात केलेल्या धडक कारवायांनी गुन्हेगारी प्रवृत्तीला चांगलाच हादरा बसला असल्याचे समोर आले आहे. बारामती तालुका,शहर पोलीस,भिगवण पोलीस ठाण्यासह महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात तसेच परराज्यातील पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अनेक गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांखालील १० ते १२ वर्षांपासून पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांच्या या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत.
बारामती तालुका पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप, तसेच गुन्हेशोध पथकाचा पदभार स्वीकारताच पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अनेक धडाकेबाज कारवाया करून आपल्या पोलीस स्टाईलने गुन्हेगारांचा पर्दाफाश केला आहे. यामुळे गुन्हेगारी विश्वपूर्णतः मोडकळीस आणले गेले. विशेषतः योगेश लंगुटे,नंदू जाधव, विनोद लोखंडे, मंगेश कांबळे यांनी जगावर ओढावलेल्या कोरोना सारख्या महाभयंकर साथीच्या आजारात देखील परराज्यात ठाण मांडून बसलेल्या कुख्यात गुन्हेगारांचा छडा लावत त्यांना जेरबंद केले होते. अनेक गुन्ह्यांचा कसोशीने व अत्याधुनिक तंत्रज्ञाचा वापर करत गुन्ह्याची उकल बारामती तालुका गुन्हेशोध पथकाने केली आहे. तसेच यापुढे देखील अशा कारवायांमध्ये सातत्य ठेऊन कामगिरी बजावणार असल्याची माहिती योगेश लंगुटे यांनी ' लोकमत' शी बोलताना दिली.
वर्षभरात तत्कालीन पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप, सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे व त्यांच्या पथकाने २ खुनाचे गुन्हे उघडकीस आणून,बारामतीत हॉटेल मध्ये एका महिलेवर बलात्कार करून खून केलेल्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा होऊन पेरॉलवरती बाहेर आला असताना १० वर्षे फरार झालेल्या आरोपीच्या गुन्हेशोध पथकाने परराज्यातून मुसक्या आवळल्या होत्या. मध्यप्रदेशसह एकूण १५ पिस्तूल हस्तगत करून म्होरक्यासह सहा आरोपींना जेलची हवा खायला पाठवण्यात आले. बारामतीतून ५० लाख रुपये किमतीचा ३१२ किलो गांजा हस्तगत करण्यात आला होता. १० ते १२ वर्षांपासून चोरीस गेलेल्या एकुण ६५ मोटारसायकली गुन्हेशोध पथकाने हस्तगत करून त्यापैकी ३५ मोटारसायकली कर्नाटकातून ताब्यात घेतल्या होत्या. असे अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत.