पालकमंत्र्यांच्या बारामतीत रोटेशनचा पुणे पॅटर्न, सोमवारपासून दुकाने उघडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 09:56 PM2020-05-10T21:56:02+5:302020-05-10T21:56:17+5:30
बारामती शहरातील आठही रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कट्फल येथील रुग्णावर मुंबई येथे उपचार सुरू आहेत .या रुग्णाच्या संपर्कातील ५२जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत
बारामती - शहरात सोमवार (दि ११) पासून पुणे शहराच्या धर्तीवर दुकाने सुरू होणार आहेत . सर्व दुकानांना दिवस ठरवून देण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे .व्यापारी वर्गाने देखील या प्रयोगाला मान्यता दिली आहे .त्यामुळे व्यापाऱ्यांच्या मागणीसह जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरवात होणार आहे. कोरोना मुक्ती च्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याने नागरिकांना दिलासा देणारा निर्णय रविवारी (दि १०) सायंकाळी पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला .या बैठकीला प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्यासह बारामती व्यापारी महासंघ अध्यक्ष नरेंद्र गुजराथी , माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव , सुभाष सोमाणी , रमणीक मोता , स्वप्नील मूथा , शैलेश साळुंके आदी उपस्थित होते .
बारामती शहरातील आठही रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कट्फल येथील रुग्णावर मुंबई येथे उपचार सुरू आहेत .या रुग्णाच्या संपर्कातील ५२जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत .त्यामुळे प्रशासनाने आजपासून काही अटींवर दुकानेनिहाय व्यवहार सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे .यामध्ये सोने दुकाने एका दिवशी , एका दिवशी कापड दुकाने अशा पध्दतीने व्यवहार सुरू करण्यास परवानगी दिली आहे .यापूर्वी प्रशासनाने एका ' लेन' मध्ये केवळ पाच दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्याची भूमिका घेतली होती .व्यापाऱ्यांनी या निर्णयाला विरोध करीत नाराजी व्यक्त केली होती .मात्र रविवारी पार पडलेल्या बैठकीत प्रशासनाने पहिला निर्णय मागे घेतला , पुणे शहाराच्या धर्तीवर सोमवार पासून ' रोटेशन ' पद्धतीने दुकाने सुरू करन्यत येणार आहेत .त्याला व्यापाऱ्यांनी मान्यता दिली आहे.
सोमवार व गुरुवारी ऑटोमोबाईल , संगणक , ई लेक्ट्रॉनिक , रेडिमेड फर्निचर , मोबाईल शॉप ,फोटो स्टुडिओ , स्वीट होम , बाटरि , खेळणी , फुले व पुष्पहार दुकाने सुरू ठेवण्यात येणार आहेत .मंगळवार व शुक्रवार कापड दुकाने , भांडी , टेलरिंग , सोने दुकाने , रस्सी पत्रावली , फूट वेअर , ज्वेलरी , घड्याळ , सूटकेस बँग हि दुकाने तर बुधवारी व शनिवारी जनरल स्टोर , सायकल , टायर , पंक्चर , स्टील ट्रेडर, स्क्रप , हार्डवेअर , बिल्डिंग मटेरियल , पेंट , कार वाशिंग , डिजिटल प्रेस प्रिंटिंग , झेरॉक्स , मातीची भांडी दुकाने , टोपल्या आदी दुकाने सुरू ठेवण्यात येणार आहेत .या सर्व दुकानांना सकाळी ८ ते सायंकाळी ६पर्यंतच खुली ठेवण्यास परवानगी दिल्याचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिलेल्या आदेशात नमूद केले आहे .याशिवाय एका वेळी ५ते १०ग्राहकांना दुकानात सोडण्यात येणार आहे , दुकानप्रवेशद्वारावर थर्मल सक्रीनिंग सुविधा असणे आवश्यक आहे , दुकानात केवळ ३३%कामगार ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे .याशिवाय कोरोना संसर्ग रोखण्यास विविध दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत .त्याकडे दुर्लक्ष केल्यास कारवाईचा इशारा प्रांताधिकारी कांबळे यांनी दिला आहे .
याबाबत बारामती व्यापारी महासंघ अध्यक्ष नरेंद्र गुजराथी यांनी ' लोकमत ' शी बोलताना सांगितले की , प्रशासनासमवेत आजची बैठक सकारात्मक पार पडली .एका लेन मध्ये पाच दुकाने सुरू करण्याच्या निर्णायाला आमचा विरोध होता .आता प्रशासनाला हा निर्णायक मागे घेतला आहे .आता पुणे शहाराच्या धर्तीवर शहरात दुकाने सुरू होणार आहेत .यामध्ये दिवसनिहाय सुरू करण्यात येणाऱ्या दुकानांची यादी प्रशासनाने तयार केली आहे , त्यानुसार सोमवार पासून दुकाने सुरू करण्यात येतील .