बारामती : केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेत बारामती नगरपालिकेचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आज विशेष सर्वसाधारण सभेत आवश्यक त्या धोरणात्मक बाबींना निर्णय घेण्याचा ठराव करण्यात आला. झोपडपट्टीमुक्त बारामतीच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय असल्याचे नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी या वेळी सांगितले. प्रधानमंत्री आवास योजना ‘सर्वांसाठी घरे’ या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील ९१ नागरी स्वराज्य संस्थांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये बारामती पालिकेचादेखील समावेश झाला आहे. योजना राबविण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. म्हाडाच्या वतीने योजनेचे कामकाज होणार आहे. झोपडपट्टीमुक्त बारामती करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. या योजनेत चार घटकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये आर्थिक दुर्बल व अल्प उत्पन्न घटकातील लाभार्थ्यांना कर्ज, संलग्न व्याज, अनुदान घरकुल निर्मितीकरिता बँका, गृहनिर्माण वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध केले जाणार आहे. तर, इतर तीन घटकांच्या अंमलबजावणीसाठी शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने अंमलबजावणी होणार आहे. या योजनेसाठी केंद्राचे दीड लाख, राज्य शासनाचे एक लाख असे अडीच लाख प्रतिलाभार्थीसाठी खर्च होणार आहे. साधारणत: ३०० चौरस मीटर चटई क्षेत्रापर्यंतची घरकुले करण्यात येणार आहे. यासाठी उत्पन्नाची मर्यादादेखील आहे. लाभार्थ्यांना इतर मूलभूत सुविधादेखील देण्याची अट घालण्यात आली आहे. त्यामध्ये वीज, पाणी, मलनिस्सारण, रस्तेसह अन्य सामाजिक सुविधांचा अंतर्भाव करावा लागणार आहे. योजना पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची सहकारी सोसायटी स्थापन करणे अनिवार्य आहे.
बारामती होणार झोपडपट्टीमुक्त
By admin | Published: April 25, 2017 4:00 AM