बारामती : शहरातील कचरा डेपोला आग लागतेय की लावली जाते, असा प्रश्न आता नागरिकच विचारू लागले आहेत. शुक्रवारी लागलेली आग विझविली. तरीदेखील कचरा डेपोतून बाहेर पडणाऱ्या धुराच्या लोटाने दररोज सकाळी रिंगरोडला चालण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना श्वसनाचा त्रास होत आहेच. त्याचबरोबर या परिसरातील रहिवाशांनादेखील त्रास होऊ लागला आहे. आज पहाटे धुराचे लोट रस्त्यावर, नागरिकांच्या घरात होते. देसाई इस्टेटच्या परिसरापर्यंत धुराचे लोट होते. या भागातील इनडोअर स्टेडियममध्ये खेळण्यासाठी आलेल्या नागरिकांना या धुराचा त्रास सहन करावा लागला. धुराचे लोट स्टेडियमच्या आतमध्ये घुसल्यामुळे खेळाडूंना खोकल्याचा त्रास झाला. त्याचबरोबर या धुरामुळे गुदमरल्यासारखे होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. यापूर्वी कचरा डेपोला सतत आग लागत होती. तीन महिन्यांपूर्वी परिसरातील नागरिकांनी उपाययोजना करण्याची मागणी केली होती. आज पहाटेपासून सकाळी १० वाजेपर्यंत धुराचे लोट दिसत होते. दुर्गंधीयुक्त धुरामुळे नागरिकांना श्वसनाचे विकार होतील, अशी तक्रार या भागातील रहिवाशांनी केली. विशेषत: लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. पाच दिवसांनंतरदेखील कचरा डेपो धुमसतच आहे. धुरामुळे नागरिकांना त्रास होतच आहे. या स्थितीत पालिकेकडून खास उपाययोजना केली जात नाही. आज धुराचे लोट बॅटमिंटन कोर्टमध्ये देखील आल्यामुळे खेळण्यासाठी आलेल्या खेळाडूंना दिवसभर खोकल्याचा त्रास झाला आहे. घशामध्ये खवखव होत असल्याची तक्रार माजी उपनगराध्यक्ष संजय संघवी यांच्यासह इतरांनी केली. धुराचे लोट अंबिकानगर, देसाई इस्टेट, रिंगरोड, श्रीरामनगर, सहयोग सोसायटी, दूध संघ वसाहत आदी ठिकाणी पसरल्यामुळे परिसरातील नागरिकांना गेली पाच दिवस हा त्रास सहन करावा लागत आहे. आग विझविण्यासाठी पाण्याचा मारा केल्यामुळे धूर वाढला आहे. उन्हाची तीव्रता वाढली आहे. आगीमुळे कचरा डेपोमध्ये गॅसेस तयार होऊन आग लागत आहे. ती विझविण्यासाठी पाण्याचा मारा केल्यावर धुराचे लोट पसरत आहे. दिवसभर धूर बाहेर पडत असतानाच रात्रीच्या वेळी वाऱ्यामुळे कचरा डेपो पुन्हा पेट घेत आहे. या ठिकाणी कायमस्वरूपी अग्निशमन दलाची गाडी तैनात ठेवली आहे. त्यामुळे आग लागल्याचे दिसताच पाण्याचा मारा केला जात आहे. कचरा ढीग मोठा असल्यामुळे आतून धुमसत असलेली आग विझली जात नाही. त्यामुळे धूर बाहेर पडतो. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी मोठा खड्डा घेऊन कचरा गाडला जाणार आहे. तरच आगीवर नियंत्रण येईल. - नीलेश देशमुख , मुख्याधिकारी
बारामती धुमसतेय!
By admin | Published: March 31, 2016 2:59 AM