—राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
बारामती : कोरोनाचा कायम असलेला धोका आणि भविष्यातील विविध महामारी आणि संकटे बघता शारीरिक तंदुरुस्ती अत्यंत महत्त्वाची आहे. या पार्श्वभूमीवर बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनने सुरू केलेली आरोग्य चळवळ पथदर्शी आहे, असे मत नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केले.
बारामती स्पोर्ट्स फाउंडेशनच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित समारंभास ते बोलत होते. या वेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, गटनेते सचिन सातव, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार म्हणाल्या, फाउंडेशनचे आयर्नमॅन सतीश ननवरे यांची चिकाटी आणि जिद्द यामुळे त्यांनी व्यक्तिगत पातळीवर अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. मात्र सुदृढ आणि सक्षम युवा पिढी घडावी यासाठी त्यांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने सुरू केलेले बारामती स्पोर्ट्स फाउंडेशन हे बारामतीमधील आमचे स्वप्न असलेल्या आरोग्य चळवळीचे यश आहे. समाजाच्या तळागाळात फिटनेस चळवळ पोहोचावी यासाठी जुन्या सायकली फाऊंडेशनतर्फे तयार करून उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या हस्ते त्या गरजू मुलांना प्रदान करण्यात आल्या.
यानिमित्ताने बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनतर्फे कृतज्ञता व बीएसएफ आयकॉन या दोन पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली. स्पोर्ट्स क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या डॉ. आदिनाथ खरात आणि स्वीमिंग प्रशिक्षक सुभाष बर्गे यांना कृतज्ञता पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. तर आयकॉन पुरस्कार फाऊंडेशनचे ६६ वर्षीय सदस्य ललित पटेल आणि अजिंक्य साळी यांना प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आयर्नमॅन सतीश ननवरे यांनी केले. फाउंडेशने गेल्या वर्षात केलेल्या उपक्रमांची माहिती ननवरे यांनी दिली. आभार फाउंडेशनचे सदस्य प्रशांत सातव यांनी मानले.