बारामती : बारामती एसटी आगाराने पुणे विभागात आता पर्यंतचा एका दिवसात सगळ्यात जास्त व्यवसाय करण्याचा विक्रम केला आहे. सोमवारी (दि. २७) या दिवशी बारामती एसटी आगाराची एसटी ३८ हजार किलोमीटर धावली असून या दिवशीचा व्यवसाय २२ लाख ४६ हजार रुपये इतका आहे. एक दिवसाचा एवढा व्यवसाय पुणे विभागाच्या इतिहासात बारामती आगाराने प्रथमच केला आहे, अशी माहिती आगारप्रमुख अमोल गोंजारी यांनी दिली.
बारामती आगारामधून लांबपल्ल्यासह, शटल बससेवा देखील सुरू असतात. राखीपौर्णिमेनिमित्त बससेवेवर मोठा ताण असतो. मात्र यावेळी चालक-वाहक यांनी चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बारामती आगाराचे सोमवार (दि. २७) चे भारमान ९७.६७ एवढे झाले आहे. आजपर्यंत एवढे भारमान कधीच आले नव्हते, अशी माहिती बारामती एसटी आगार व्यवस्थापक अमोल गोंजारी यांनी दिली. यशात आगारातील विभाग नियंत्रक, यंत्र अभियंता, चालक, वाहक, यांत्रिक, प्रशासकीय कर्मचारी यांचा सिंहाचा वाटा आहे, असे गोेंजारी यांनी सांगितले. पुणे जिल्ह्यात १३ आगर आहेत त्यापैकी बारामती शहर आणि एमआयडीसी असे २ आगर तर बारामतीतच आहेत. बारामती मुख्य आगर आहे. बारामती आगारात २३२ चालक व १७८ वाहक, ६० मेकॅनिक तर ३२ कार्यालयीन स्टाफ आहे. बारामती आगारकडे १०० एसटी बस आहेत. बारामती शहरात आसपासच्या गावातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी येतात त्यामुळे सकाळी व संध्याकाळी विद्यार्थी, कामगार, व प्रवाशी,यांचा मोठा ताण असतो. त्याच प्रमाणे बसस्थानकाच्या आवारामध्ये अवैध पार्किंगचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी वरिष्ठांकडे सुरक्षारक्षकांची मागणी केली आहे. वेळोवेळी नवीन गाड्या सोडण्याबाबत विचार केला जाईल, अशी माहितीही गोंजारी यांनी दिली.राखी पौर्णिमेनिमित्त राज्यात एका दिवसात सर्वात जास्त उत्पन्न मिळवल्याबद्दल महराष्ट्र एसटी कामगार सेनेच्यावतीने आगारप्रमुख अमोल गोंजारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघटक सचिव बाळासाहेब गावडे व सर्व सहकारी तसेच कर्मचारी संजय टिकोळे, तानाजी लोखंड, प्रताप पवार, तात्या आटके, गजानन शिंदे ,लेखा अधिकारी खुळपे, मानमोडे, संजय रत्नपारखी आदी उपस्थित होते.विशेष सेवा देणार४माळेगावला जाण्यासाठी महिलांना वेगळी बस सुरू करणार येणार आहे. या मार्गावर कृषी महाविद्यालय, शारदानगर, अभियांत्रिकी महाविद्यालय यामुळे विद्यार्थिनींची संख्या मोठी आहे.४बारामतीहुन मुंबई कडे जाण्यासाठी रात्रीच्या गाड्या आहेत पण दिवस भर गाडी नाही त्यामुळे गाड्या बदलत जावे लागते. त्यासाठी मुंबईला जाण्यासाठी सकाळची बारामती मुंबई गाडी लवकरच सुरू करणार आहे.