पुणे : कऱ्हा नदीवरील पुलाला भगदाड पडल्याने सासवड-जेजुरी रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. याचा फटका एसटी महामंडळाच्या एसटीला बसला. या मार्गाने बारामती, इंदापुर, फलटण, पंढरपुर यांसह विविध ठिकाणांहून बसच्या दररोज शेकडो फेऱ्या होतात. पण या सर्व गाड्या अन्य मार्गाने वळविल्या आहेत. बारामतीला ये-जा करणाऱ्या बस पाटसमार्गे धावत असून पुलाची दुरूस्ती होईपर्यंत याचमार्गे बस धावतील, अशी माहिती एसटी महामंडळाचे पुणे विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांनी दिली.पुरंदर तालुक्याला मंगळवारी रात्री जोरदार पावसाने झोढपून काढले. त्यामुळे कऱ्हा नदीला पुर येवून सासवड-जेजुरी मार्गावरील पुल पाण्याखाली गेला. त्यानंतर काही वेळातच पुलाला मोठे भगदाड पडून वाहतुक ठप्प झाली. या मार्गावरून दररोज बारामती ते पुणे ही विनाथांबा बससेवा सुरू असते. तसेच इंदापुर, पंढरपुर, फलटण यांसह विविध भागातून निरामार्गे येणाऱ्या बसची संख्याही खुप आहे. त्यामुळे दररोज शेकडो बसफेऱ्या होत असतात. पण पुल खचल्याने मार्गावरील बससेवा पूर्णपणे ठप्प झाली. त्यानंतर एसटी प्रशासनाने पुण्यातून पाटसमार्गे बारामती, इंदापुर, सोलापुर, पंढरपुर व इतर ठिकाणी बस सोडल्या. तर पंढरपुर, फलटण यांसह अन्य निरामार्गे पुण्यात येणाऱ्या बस लोणंद, शिरवळमार्गे सोडण्यात येत आहेत. सासवड आगारातून होणारे बससंचलन दिवसभर ठप्प राहिले. सासवडचा पुल खचला असला तरी बसफेऱ्या रद्द केलेल्या नाहीत. पण बारामतीकडे पाटसमार्गे जाणाऱ्या विनावाहक बसचे तिकीट दर एका टप्प्याने वाढविले आहे. प्रवाशांची गर्दीनुसार बस सोडण्यात येत आहेत. सोलापुर व पुणे विभागाने मार्ग ठरवून घेतले आहेत. पुलाचे काम पुर्ण होईपर्यंत यामार्गे बससेवा सुरू राहील, असे जोशी यांनी सांगितले.
बारामती एसटी पाटसमार्गे सुरू राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 8:27 PM
कऱ्हा नदीवरील पुलाला भगदाड पडल्याने सासवड-जेजुरी रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. याचा फटका एसटी महामंडळाच्या एसटीला बसला...
ठळक मुद्देबारामती, इंदापुर, फलटण, पंढरपुर यांसह विविध ठिकाणांहून बसच्या दररोज शेकडो फेऱ्यासासवड आगारातून होणारे बससंचलन दिवसभर राहिले ठप्प