बारामती : शहरात बहुमजली भाजीमंडई व व्यापार संकुल उभे राहत आहे. बारामती शहराची पाच पट हद्दवाढ झाली आहे. याचअनुषंगाने जुनी गणेश भाजीमंडई पाडून त्या ठिकाणी तब्बल २२ कोटी ४० लाख रुपये खर्च करून अत्याधुनिक सुविधा असलेली मंडई आकाराला येत आहे. या इमारतीत वाहनतळाचीदेखील सोय होणार असल्याने वाहने लावण्यासाठी होत असलेला मोठा प्रश्न सुटणार आहे.जुन्या हद्दीत दोन भाजीमंडया होत्या. त्यांपैकी जुन्या भाजीमंडईच्या जागेवर नगरपालिकेने व्यापार संकुल उभारले. तर, श्रीगणेश भाजीमंडईत व्यापारी गाळ्यांसह भाजीपाला, फळभाज्या विक्रीसाठी ओटे बांधण्यात आले होते. लोकसंख्यावाढीमुळे या भाजीमंडईची जागा अपुरी पडू लागली. गुरुवारी आठवडेबाजाराला शेतीमाल विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांना रस्त्यावर बसावे लागत होते. त्याचअनुषंगाने तालुकास्तरीय हा मोठा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या बहुमजली भाजीमंडईचा आराखडा जयंत किकले यांनी तयार केला.जवळपास ८०० वाहनांच्या पार्किंगची सोय होणार आहे. त्यामध्ये २०० चारचाकी वाहने, ६०० दुचाकी वाहने बसतील. ५८ व्यापारी गाळे काढण्यात येणार आहे. तर भाजीपाला, फळभाज्या विक्रीसाठी २६२ ओटे बांधण्यात येणार आहेत. या इमारतीसाठी १४ कोटी ३५ लाख राज्य शासनाकडून उपलब्ध होणार आहे. ३ कोटी ५८ लाख नगरपालिकेच्या निधीतून खर्च होणार आहेत. तर, ५ कोटी रुपये आमदार अजित पवार यांच्या प्राथमिक सुविधा अनुदान योजनेतून उपलब्ध होणार आहेत. राज्य शासनाने ७ कोटी १७ लाख रुपयांचा पहिला हप्ता दिला आहे. त्यातील २ कोटी ७२ लाख रुपये आतापर्यंत खर्च करण्यात आले आहेत. या मंडईलगतच असलेल्या जागेतदेखील ४५ गाळ्यांचे व्यापार संकुल उभारण्यात येणार आहे. स्वच्छतागृहासह अन्य सुविधा देण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनी दिली. शहरात ९ भाजीमंडया सुरू करणारशहरात ९ ठिकाणी भाजीमंडई सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष सुभाष सोमाणी यांनी दिली. जळोची भागात दीड एकरांत भाजी मंडई उभारली जाणार आहे. कसबा, सूर्यनगरी, खंडोबानगर, तांदूळवाडी या ठिकाणीदेखील भाजीमंडई सुरू होणार आहे. जळोची, मार्केट यार्ड येथे भाजी मंडई तातडीने सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरात भाजीखरेदीसाठी येणाऱ्यांची संख्या कमी होईल. त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी मंडईची सोय झाल्यामुळे मोठा प्रश्न सुटणार आहे.
बारामतीत उभी राहतेय बहुमजली भाजीमंडई
By admin | Published: October 08, 2015 5:34 AM