बारामती : बारामती आगारावर सध्या प्रवाशांचा प्रचंड भार पडत आहे. त्या तुलनेत बसगाड्यांची संख्या कमी असल्याने बस स्थानकात कायमच गर्दी असल्याचे दिसून येते. बारामती बस स्थानकामध्ये दुपारी एकपर्यंत आणि संध्याकाळी पाचनंतर प्रवाशांचा प्रचंड भार पडत आहे. या वेळेत महाविद्यालयीन विद्यार्थी, कामगार आणि कामानिमित्त येणाऱ्या प्रवशांची मोठ्या प्रमाणत गर्दी होत असते. बारामती येथून नीरा, जेजुरी, वालचंदनगर, भिगवण आदी ठिकाणी प्रवाशांची संख्या लक्षात घेता, दर १० ते २० मिनिटांनी बसची आवश्यकाता आहे. मात्र, प्रवाशांच्या तुलनेत आगाराकडे बससंख्या कमी आहे. बारामती आगाराला १०६ बसगाड्यांची मंजुरी आहे. तेवढ्या बसगाड्या आगाराकडे उपलब्ध आहेत. मात्र, प्रासंगिक करार, शालेय सहली, जत्रा-यात्रा ‘स्पेशल’ यांसाठी आगाराकडे दररोज पाच गाड्यांची मागणी असते. त्यामुळे या गाड्या द्याव्या लागतात. सध्या आगाराकडे २१५ वाहक व २४८ चालक आहेत. रोजच्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता, आगाराला आनखीन २० गाड्यांची गरज आहे. त्याचप्रमाणे, २० वाहक व २० चालकांचीही आवश्यकता आहे. तरच, आगारावरील हा ताण हलका होण्यास मदत होईल, अशी माहिती बारामती आगाराचे आगारप्रमुख रमाकांत गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. संध्याकाळी सातनंतर वालचंदनगर, नीरा, भिगवण, इंदापूर, जेजुरी आदी ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना वेळेवर बसगाड्या उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे तासन् तास प्रवाशांना बस स्थानकात ताटकळत बसावे लागत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत आहे. (प्रतिनिधी)
बारामतीत एसटीसेवा अपुरी
By admin | Published: November 19, 2014 4:32 AM