मोरगाव: तालुक्यात खरीप हंगामातील पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात केली जाते. कृषी विभागाचे यंदाचे २५ हजार हेक्टरवर पिकांच्या पेरणीचे उद्दिष्ट आहे. या हंगामात युरियाची मागणी अधिक असून गेल्या १६ जूनपासून २७०० मेट्रिक टन युरियाची आवक तालुक्यात करण्यात आली असल्याची माहिती बारामती तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी दिली.
गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी तालुक्यातील पणदरे, माळेगाव, मोरगाव, सोमेश्वरनगर, सुपा, जळगाव, उंडवडी, तरडोली, मुर्टी आदी परिसरात खरिपाची मोठी पेरणी होत आहे. बागायती भागात आडसाली ऊस व मका तर पश्चिम भागात कांदा, बाजरी, सूर्यफूल, ऊस, मूग, मटकी, सोयाबिन आदी पिके घेतली जातात. या सर्व पिकांसाठी तालुक्याच्या ग्रामीण भागातून युरियाची मागणी जास्त प्रमाणात वाढू लागली आहे. बागायती पट्ट्याच्या मानाने जिरायती भागात खतविक्रीची दुकाने कमी असल्याने उपलब्ध साठा व मागणी यांचा अद्यापतरी मेळ बसला नसल्याने युरिया खरेदीसाठी सकाळपासून रांगा लागत आहेत. गेल्या महिन्यातील १६ जूनपासून आज अखेरपर्यंत खासगी व सहकारी दुकानात २७०० मेट्रिक टन युरियाची आवक झाली आहे. शेतकऱ्यांना समप्रमाणात वाटप होण्यासाठी एका आधारवर एक युरिया गोणी देण्यात येत असल्याची माहिती कृषी विभागाकडून करण्यात आली.
युरियाचा पुरवठा मागणीप्रमाणे केला जात आहे. आगामी आठ दिवसांत पुरवठा आणखी सुरळीत होईल. मात्र, शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा अतिरीक्त वापर टाळावा.
- दत्तात्रय पडवळ,
तालुका कृषी अधिकारी