लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : बारामतीमध्ये कोरोनाचा उद्रेक वाढल्यामुळे शिक्षक सोसायटीने शहरातील अशोकनगर येथील इमारत कोविड सेंटरसाठी ३ महिन्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. येथे सुसज्ज कोविड रुग्णालय सुरू करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष विशाल खरात, उपाध्यक्ष गणेश भगत यांनी दिली.
बारामतीत सध्या दौंड, इंदापूर, फलटण, पुरंदर तालुक्यासह नगर, सातारा व सोलापूर जिल्ह्यातूनही रुग्ण येत आहेत. आता तर पुण्यातूनही रुग्ण बारामतीत येऊ लागल्याचे चित्र आहे. या परिस्थितीमुळे बारामतीतील आरोग्य यंत्रणेवरील ताण कमालीचा वाढू लागला आहे. शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत असून आजपर्यंत बारामतीत तब्बल ३२४ मृत्यू कोरोनामुळे झाले आहेत. बारामतीमधील कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे बेड मिळण्यात अडचणी येत आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.शिक्षक सोसायटीच्या इमारतीमधील कोविड सेंटरमध्ये ८५ बेड उपलब्ध होणार असल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे
---------------------------------
निसर्गोपचार सुविधा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार संचालक मंडळाने ३ महिन्यांसाठी संस्थेची इमारत कोविड रुग्णांसाठी उपलब्ध करून दिली आहे.पुण्यातील संकल्प संस्थेच्या वतीने आरोग्यनिर्भर किट्सच्या माध्यमातून निसर्गोपचार सुविधा देखील उपलब्ध होणार असल्याची माहिती संस्थेचे वसतीगृह चेअरमन शिवदत्त भोईटे यांनी दिली
----------------------------
शिक्षकांसाठी राखीव बेड
अशोक नगर येथील कोविड केअर सेंटरमध्ये आयसोलेशन बेड-५०,ऑक्सिजन बेड-३०,व्हेंटिलेटर बेड-५ उपलब्ध झाले आहेत. शिक्षकांच्या परिवारातील रुग्णांसाठी ५ बेड राखीव ठेवण्यात येणार असल्याची माहिती सचिव संतोष राऊत यांनी दिली.