लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : बारामती शहरा प्रमाणेच ग्रामीण भागात देखील विषाणूजन्य आजाराने नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत. वातावरणातील बदल, डासांचा उद्रेक जास्त झाल्याने चिकुन गुनिया, गोचीड ताप, डेंगी या आजारांबरोबरच थंडी तापाचे रुग्ण वाढले आहेत. विशेषत: बारामती तालुक्यातील मोरगाव, तरडोली या गावांमध्ये तापाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सर्वेक्षण सुरू;कोरडा दिवस पाळा...डेंगी, चिकुनगुनिया, गोचीड ताप या आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी कीटकशास्त्रीय सर्वेक्षणाबरोबरच नगरपालिकेकडून औषध व धूर फवारणी सुरू करण्यात आली आहे. कोरडा दिवस पाळण्यासाठी आवाहन केले जात आहे. तसेच, पावसाळ्यात साठलेल्या पाण्याच्या डबक्यांवर एमएलओ आॅईल (मलेरिया प्रतिबंधक तेल) सोडण्यात येत आहे. त्यामुळे डासांना या पाण्यात अंडी घालता येत नाही. मोरगाव, तरडोलीत रुग्णांच्या संख्येत वाढ...या विषाणूजन्य आजारांना नागरिकांकडूनदेखील आमंत्रण दिल्यासारखेच चित्र आहे. नारळाच्या करवंट्या, तुळशीवृंदावनात ठेवलेले गाडगे तसेच, अनेक दिवस पाणी साठवून ठेवले जात असल्याने डासांच्या अंड्यांची उत्पत्ती वाढत आहे. बारामती शहरातदेखील नागरिकांमध्ये याबाबत सातत्याने जागृती केली जात असताना फरक पडत नाही. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मोरगावमध्ये चार रुग्ण चिकुनगुनियाचे आढळून आले. तर तरडोलीत डासांचे प्रमाण जास्त असल्याने तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. सर्वेक्षणात साठलेल्या पाण्यात आढळल्या डासांच्या अळ्याबारामती शहराच्या विद्यानगर परिसरात देखील डासांचा उद्रेक आहे. संपूर्ण बारामती शहरातच चिकुनगुनिया, गोचीड तापसह थंडी तापाचे रुग्ण वाढलेले दिसत आहेत. बारामतीच्या सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्यादेखील वाढली आहे. त्याचबरोबर खासगी रुग्णालयात देखील याच आजाराने त्रस्त असलेल्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. विद्यानगर परिसरात हा उद्रेक थांबविण्यासाठी हिवताप विभाग, पंचायत समिती आरोग्य विभाग, नगरपालिका आरोग्य विभागाने संयुक्त सर्वेक्षण सुरू केले आहे. धार्मिक कामासाठी आलेल्या छोट्या मडक्यात पाणी साठल्याने डासांच्या आळ्यांची उत्पत्ती झाल्याचे आढळून आले. प्लॅस्टीकच्या ड्रममध्ये अनेक दिवस साठवलेल्या पाण्यामध्ये देखील डासांच्या आळ्या आढळून आल्या आहेत. साठलेले पाणी वेळीच फेकून दिले. आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळला तरी देखील यातून सुटका होणार आहे. एका वेळी दीडशे ते दोनशे आळ्या घातल्या जातात. त्यामुळे कीटकशास्त्रीय आजारात वाढ झाल्याने हिवताप विभागाकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे. डासाच्या आळ्या असलेल्या पाण्याचे साठे मोकळे करीत आहेत. परंतु, या विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगून देखील नागरिक पाणी फेकून देण्यास तयार नसतात. ही देखील गंभीर बाब आहे. शहरात डेंगीसदृश रुग्ण आढळलासध्या तरी बारामती शहर, तालुक्यात थंडीतापाचा उद्रेक आहेच. त्याचबरोबर डेंगीसदृश रुग्णदेखील आढळून आला आहे. त्याच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या रक्ताचे नमुने राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळा पुणे या ठिकाणी पाठविण्यात आले आहेत. इतर आजारांचे नमूने बी. जे. मेडिकल कॉलेज पुणे येथे पाठविण्यात येत आहेत. हे आजार टाळण्यासाठी आरोग्य विभागाकडून उपाययोजना केल्या जात असताना नागरिकांनीदेखील काळजी घेण्याची गरज आहे. अनेक दिवस साठलेले पाणी फेकून देणे, पाण्याची डबकी बुजवणे, परसबागेतील झाडांच्या कुंड्यातील पाणी बदलणे आदी उपाययोजना करण्याची गरज आहे.
बारामती तापाने फणफणला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 4:04 AM