Baramati Vidhan Sabha Election Result 2024 Live : बारामतीचे 'दादा' अजित पवारच! पुतण्याला चितपट करत साकारला ऐतिहासिक विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 04:35 PM2024-11-23T16:35:24+5:302024-11-23T16:40:28+5:30
Baramati Assembly Election 2024 Result Live Updates: अजित पवार यांना पुन्हा एकदा या मतदारसंघावर आपलं वर्चस्व सिद्ध करत मोठा विजय मिळवला आहे.
Baramati Assembly-Vidhan Sabha Election 2024 Result Live:बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांनी १ लाख १६ हजारांच्या मताधिक्यासह ऐतिहासिक विजय मिळवला आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर होत असलेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात पवार विरुद्ध पवार अशी लढाई झाली होती. अजित पवार यांना त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी घेत आव्हान दिलं होतं. स्वत: शरद पवार यांची ताकदही युगेंद्र पवारांच्या पाठीशी असल्याने बारामतीत यंदा अटीतटीची लढत होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र अजित पवार यांना पुन्हा एकदा या मतदारसंघावर आपलं वर्चस्व सिद्ध करत मोठा विजय मिळवला आहे.
बारामती मतदारसंघातून अजित पवार यांना एकूण १ लाख ९६ हजार ६४० मते मिळाली, तर युगेंद्र पवार यांना अवघ्या ८० हजार ४५८ मतांवर समाधान मानावं लागलं. बारामती विधानसभेसाठी यंदा ३ लाख ८० हजार ६०८ मतदारांपैकी २ लाख ७२ हजार ४०८ मतदारांनी मतदान केले. यामध्ये १ लाख २९ हजार ४०१ स्त्रिया, तर १ लाख ५२ हजार ९९६ पुरुष मतदार,तसेच इतर ११ मतदारांचा समावेश होते. यंदा एकूण ७१.५७ टक्के मतदान झाले होते. २०१९ मध्ये ६८.२८ टक्के मतदान झाले होते. त्यानुसार तुलनेने यंदा मतदानामध्ये ३.२९ टक्के वाढ झाली होती. २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीतही अजित पवार यांना १ लाख ९५ हजार ६४१ मते मिळाली होती. तर तत्कालीन भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना ३० हजार ३७६ मते मिळाली होती. पवार यांना त्यावेळी १ लाख ६५ हजारांपेक्षा अधिक मतांचे विक्रमी मताधिक्य मिळाले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबात फूट पडल्यानंतर बारामतीत पवार विरुद्ध पवार असे निवडणुकीचे समीकरण सुरू झाले होते. ज्येष्ठ नेते शरद पवार विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार या काका-पुतण्यांनी बारामतीच्या इतिहासात प्रथमच एकमेकांविरोधात शड्डू ठोकला होता. त्याची सुरुवात लोकसभेपासूनच झाली. यामध्ये सुळे विरोधात उपमुख्यमंत्री पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरविण्यात आले. यामध्ये सुनेत्रा पवार यांना पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र आता अजित पवारांनी दमदार कमबॅक करत विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे.
सुप्यात अजित पवारांच्या विजयाचा जल्लोष
बारामती विधानसभा मतदार संघाकडे साऱ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या लक्षवेधी लढतीत अजित पवार यांचा १,१६,१८२ मताच्या फरकाने विजय झाला. त्यामुळे सुपेकरांनी बाजार मैदानावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून गुलालाची उधळण करीत फटाके फोडत विजयी जल्लोष साजरा केला.
मागील काही दिवसांपासून लक्ष लागून राहिलेल्या बारामती विधानसभा निवडणुकीत घड्याळ चालणार की तुतारी, असे संदिग्घ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे आज सकाळपासून मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज सकाळपासून सुप्यातील चौका चौकात तरुणाईसह सर्वच जण निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष ठेवून होते. त्यामुळे येथे सर्वांचेच मोबाईलमध्ये येणाऱ्या निकालाकडे लक्ष होते. मात्र या हाय होल्टेज ड्रामामध्ये अखेर अजित पवार यांनी त्यांचा पुतण्या युगेंद्र पवार यांचा दारुण पराभव केला.