बारामती : लाेकसभेला ताई आणि विधानसभेला दादा या समीकरणाची चर्चा आतापर्यंत होत होती. मात्र, आता विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांना मैदानात उतरवले.
त्यातच शरद पवारांनी बारामतीच्या विकासाची सूत्रे नव्या पिढीच्या हाती द्या असे सांगितले तर अजित पवारांनी बारामतीचा विकास मीच करू शकतो, असे ठणकावून सांगितले आहे. भावनिक खेळीही झाल्याने दोघांमध्ये अटीतटीची लढत पहायला मिळाली. गतवेळच्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का वाढला आहे. त्यामुळे हे नवमतदारच बारामतीचा आमदार ठरवणार असल्याचे चित्र सध्या तरी पहायला मिळते.बारामती विधानसभेसाठी यंदा आज ३ लाख ८० हजार ६०८ मतदारांपैकी २ लाख ७२ हजार ४०८ मतदारांनी मतदान केले. यामध्ये १ लाख २९ हजार ४०१ स्त्रिया, तर १ लाख ५२ हजार ९९६ पुरुष मतदार,तसेच इतर ११ मतदारांचा समावेश आहे. यंदा एकूण ७१.५७ टक्के मतदान झाले आहे. २०१९ मध्ये ६८.२८ टक्के मतदान झाले होते. त्यानुसार तुलनेने यंदा मतदानामध्ये ३.२९ टक्के वाढ झाली आहे. २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीतही अजित पवार यांना १ लाख ९५ हजार ६४१ मते मिळाली होती. तर तत्कालीन भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना ३० हजार ३७६ मते मिळाली होती. पवार यांना त्यावेळी १ लाख ६५ हजारांपेक्षा अधिक मतांचे विक्रमी मताधिक्य मिळाले होते.राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबात फूट पडल्यानंतर बारामतीत पवार विरुद्ध पवार असे निवडणुकीचे समीकरण सुरू झाले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार या काका-पुतण्यांनी बारामतीच्या इतिहासात प्रथमच एकमेकांविरोधात शड्डू ठोकला. त्याची सुरुवात लोकसभेपासूनच झाली. यामध्ये सुळे विरोधात उपमुख्यमंत्री पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरविण्यात आले. यामध्ये सुनेत्रा पवार यांना पराभव स्वीकारावा लागला. केवळ बारामती मधून सुळे यांना लोकसभा निवडणुकीत ४७ हजार मतांचे मताधिक्य दिले.लोकसभा निवडणुकीप्रमाणेच बारामतीमध्ये यंदा विधानसभा निवडणुकीसाठी मतदारसंघात जिरायती भागातील पाणीप्रश्नासह, रोजगार, नीरा नदी प्रदूषण आदी अनेक मुद्दे आहेत. यंदा महाविकास आघाडीने उपमुख्यमंत्री पवार यांच्याविरोधात त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. जे राजकारणात नवखे आहेत. त्यांनी यापूर्वी कोणतीही निवडणूक लढविलेली नाही. त्यांना थेट विधानसभेच्या आखाड्यात उतरविण्यात आले आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी खुद्द ज्येष्ठ नेते शरद पवार उपस्थित होते. आजपर्यंत बारामतीत मला आणि अजित पवार यांना संधी दिली.
आता तरुणांना संधी द्या, युगेंद्र पवार हे तरुण उच्चशिक्षित आहेत, त्यांना शेतीची, कारखानदारीची जाण आहे, त्यांना निवडून द्या, अशी साद ‘साहेबां’नी बारामतीकरांना घातली. तर उपमुख्यमंत्री पवार यांनी बारामती शहरासह तालुक्यासाठी स्वतंत्र जाहिरनामा प्रसिद्ध करीत विकासाचे ‘व्हिजन’ मांडले. त्यासाठी बारामतीकरांनी निवडून देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले होते. दरम्यान, बारामतीकर कोणाला पसंती देणार हे शनिवारीच स्पष्ट होईल.दोघांकडूनही पाणीप्रश्न सोडवण्याचे आश्वासनउपमुख्यमंत्री पवार यांनी स्वत: मॅराथाॅन दाैरे करीत बारामती मतदारसंघ पिंजून काढला. याशिवाय त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार, पुत्र पार्थ पवार, जय पवार, भगिनी विजया पाटील यांनी निवडणुकीची सूत्रे हाती घेत मतदारांशी संवाद साधला. तसेच मतदारसंघात दाैरे केले. तर युगेंद्र पवार यांच्यासाठी खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, आई शर्मिला पवार, वडील श्रीनिवास पवार, रेवती सुळे यांनी प्रचारात सहभाग घेत मतदारसंघात लक्ष घातले. उपमुख्यमंत्री पवार यांनी जिरायती भागाचा दुष्काळी डाग पुसण्याबरोबरच रोजगार निर्मितीचा शब्द दिला आहे. तर युगेंद्र पवार यांनी देखील पाणी प्रश्न सोडविण्याबरोबरच बारामतीत आयटी पार्क उभारण्याचा शब्द दिला आहे. शेवटच्या दिवशी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सभा घेतली. मात्र, प्रचाराच्या सांगता सभेत त्यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्यावर अधिक टीका करणे टाळले.