सांगवी : बारामती - फलटण रस्त्यावरील वळणावर अज्ञात वाहन व दुचाकीस्वार यांच्यात झालेल्या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. तर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बबलू जीतमलजी बंजारा (वय २८, रा. लोहारदे जि. झारवाड़, राजस्थान) असे अपघातात मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. मात्र, अज्ञात वाहनाने अपघातानंतर धूम ठोकली. बबलू हा दुचाकीवरून दुपारी ३ वाजण्याच्या सुमाराला फलटणच्या दिशेकडून बारामतीकडे जात होता. शिरवलीजवळील जरांडेवस्ती येथील चारीच्या पुलावर रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडांमुळे समोरून येणाऱ्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात तरुण जागीच मरण पावला. या दुर्दैवी घटनेमुळे नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. तरुणाच्या दोन साथीदारांना किरकोळ दुखापत झाली. जखमी व मृतदेह रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी स्थानिक तरुणांनी यावेळी मदत केली. वारंवार होणाऱ्या अपघातास प्रशासन जबाबदार असून रस्त्यावरील पडलेले खड्डे, दुतर्फा वाढलेली काटेरी झाडे-झुडपे वाहनचालकांच्या मृत्यूस आता कारणीभूत ठरू लागली आहेत.
काही वर्षांच्या कालावधीत रखडलेल्या बारामती फलटण रस्त्याने कित्येक निष्पाप लोकांचे बळी
मागील काही वर्षांच्या कालावधीत रखडलेल्या बारामती फलटण रस्त्याने कित्येक निष्पाप लोकांचे बळी घेतले आहेत.तर सध्या या रस्त्याच्या कडेने अनेक झाडे झुडपे वाढली आहेत. नवीन चालकांना याचा अंदाज न आल्याने अनेकदा समोरील वाहनांवर जात असतात, यामुळे सातत्याने अपघात वाढू लागले आहेत. तसेच पाहुणेवाडी येथील स्मशानभूमी समोर दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यावर जड वाहनांमुळे मोठे खड्डे निर्माण होतात. यामुळे याठिकाणी आपघात होण्याची शक्यता वर्तवली जाते. याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे. या घटने बाबत बारामती तालुका पोलीस अधिक तपास करत आहेत.