पुणे (बारामती ) : राज्यात शनिवारी (दि २३) भल्या सकाळीच झालेल्या राजकीय भुकंपाचे राष्ट्रवादीच्या माहेरघरी बारामतीत तीव्र पडसाद उमटले. राजकीय घडामोंडींपेक्षा बारामतीची ओळख असणाऱ्या पवार कुटुंबियांमध्ये फुट पडल्याचे समजताच येथील नागरीकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या अस्वस्थेतेतच ‘अजितदादां’ना उपमुख्यमंत्री पद मिळाल्याचा आनंद विरुन गेल्याचे चित्र होते. आज सकाळी देवेंद्र फडवणीस यांनी मुख्यमंत्री म्हणुन, तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणुन शपथ घेतली. त्यानंतर थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप समवेत जाण्याचा अजित पवार यांचा निर्णय वैयक्तिक आहे,यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा संबंध नसल्याचे जाहीर केले. तसेच दुपारी १२ च्या दरम्यान अजित पवार यांची राष्ट्रवादीच्या विधीमंडळ पक्षनेते पदावरुन हकालपट्टी झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर बारामतीत शांतता पसरली.यावेळी उपमुख्यमंत्री पद मिळाल्याचा आनंदापेक्षा ही शांतता अधिक ठळकपणे जाणवली.दरम्यान, अजित पवार यांच्या शहरातील सहयोग निवासस्थानी पोलीसांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. शहरात देखील पोलीस बंदोबस्त ठेवल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीच्या काही समर्थकांनी बारामतीत फटाक़े वाजवले.मात्र, अपेक्षित गर्दी,तो जल्लोष दिसलाच नाही.
अस्वस्थेतेतच विरला ‘अजितदादां’च्या उपमुख्यमंत्री पदाचा आनंद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 1:35 PM